मान्सून आणखी एक रेकॉर्ड ब्रेक करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 05:47 AM2019-09-19T05:47:54+5:302019-09-19T05:48:03+5:30

मुंबईत १९५८ साली ३ हजार ७५९.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस आहे.

Monsoon will break another record | मान्सून आणखी एक रेकॉर्ड ब्रेक करणार

मान्सून आणखी एक रेकॉर्ड ब्रेक करणार

Next

- सचिन लुंगसे 
मुंबई : मुंबईत १९५८ साली ३ हजार ७५९.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस आहे. या वर्षीच्या पावसाच्या नोंदीचा विचार करता, जून महिन्यापासून १८ सप्टेंबरपर्यंत मुंबईत ३ हजार ४७५.२ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. १९५८ सालचा आपलाच विक्रम मोडीत काढण्यास मान्सूनला या वर्षी २८४.५ मिलीमीटर पावसाची गरज असून, सप्टेंबर महिना संपेपर्यंत मान्सून हा आणखी एक रेकॉर्ड ब्रेक करण्याची शक्यता आहे. दरम्यान, १९८६ साली मुंबईत १ हजार ३४१.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हा मुंबईतील आतापर्यंत सर्वाधिक कमी पाऊस आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील नोंदीनुसार, कुलाबा वेधशाळेत १९०१ ते २०१९ या कालावधीदरम्यान १९५४ साली ३ हजार ४२३.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा पाऊस आहे. १९१८ साली ५८४.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. हा आतापर्यंत सर्वाधिक कमी पाऊस आहे. सद्यस्थितीमध्ये जून महिन्यापासून कुलाबा वेधशाळेत नोंदविण्यात आलेला पाऊस २ हजार ४२८.६ मिलीमीटर एवढा असून, पावसाळा अधिकृतरीत्या संपण्यास अद्यापही काही दिवस शिल्लक आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांपासून मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पावसाची तुफान फटकेबाजी सुरू आहे. नेरुळमध्ये १०२.६० मिलीमीटर, पालघरमध्ये ३४, पनवेलमध्ये ११४.६०, खालापूर १६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
>परतीच्या पावसाला ‘लेटमार्क’
सप्टेंबर महिना हा मान्सूनचा परतीचा महिना म्हणून ओळखला जातो. आणि सामान्यपणे १ सप्टेंबरच्या आसपास पश्चिम राजस्थानपासून या प्रवासाला सुरुवात होते. कोणत्याही परिस्थितीत मान्सूनच्या परतीस १ सप्टेंबरपूर्वी सुरुवात होत नाही. बहुतेक वेळा परतीस विलंब होतो आणि सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात परतीस सुरुवात होते. मात्र या वर्षी सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाला तरीदेखील अद्याप परतीच्या पावसाला प्रारंभ झालेला नाही.
स्कायमेटकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०११ ते २०१८ पर्यंतच्या मान्सून परतण्याच्या तारखांनुसार, २०११ मध्ये २३ सप्टेंबरच्या सुमारास मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला. २०१२ मध्ये २४ किंवा २५ सप्टेंबरच्या आसपास मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला. २०१३ मध्ये २३ ते २६ सप्टेंबरदरम्यान मान्सून माघारी फिरला. २०१५ हे वर्ष अपवाद होते; या वर्षी मान्सूनने परतीस ४ ते ७ सप्टेंबरदरम्यान सुरुवात केली होती; जी सामान्य तारखेच्या अगदी जवळ होती. २०१६ मध्ये मान्सूनच्या परतीस सप्टेंबरच्या मध्यात सुरुवात झाली. २०१७ आणि २०१८ मध्ये मान्सून २७ ते ३० सप्टेंबरच्या आसपास माघारी निघाला.मान्सूनच्या परतीच्या पावसाच्या तारखांचा विचार करता २०११ ते २०१८ च्या दरम्यान फक्त २०१५ हे वर्ष अपवाद होते. जेव्हा मान्सूनने १५ सप्टेंबरपूर्वी माघार घेतली होती. उर्वरित वर्षांत १५ सप्टेंबरनंतर मान्सूनची माघार सुरू झाली. सप्टेंबरच्या अखेरीस एकाच वेळी मोठ्या भागातून मान्सूनची माघार झालेली असते. २० सप्टेंबरच्या सुमारास मान्सून माघारी फिरण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र यात बदल होण्याची शक्यता आहे.
>मान्सूनच्या परतीचे मापदंड
सलग ५ दिवस पावसाची अनुपस्थिती
वाºयात बदल
प्रतिचक्रवात तयार होणे
आर्द्रता कमी होणे
तापमानात झालेली वाढ
१७ सप्टेंबर २०१९ पर्यंतचा पाऊस (मिमी)
कुलाबा : २ हजार ४२८.६
सांताक्रुझ : ३ हजार ४७५.२
वार्षिक सरासरी (मिमी)
कुलाबा : २ हजार २०३
सांताक्रुझ : २ हजार ५१४
२०१९ सालची टक्केवारी
कुलाबा : ११०.२४ टक्के
सांताक्रुझ : १३८.२३ टक्के
>१७ सप्टेंबर २०१८ पर्यंतचा पाऊस (मिमी)
कुलाबा :
१ हजार ७३७.९
सांताक्रुझ :
२ हजार २१७.६
२०१८ सालची टक्केवारी
७७.७९ टक्के
८८.१७ टक्के

Web Title: Monsoon will break another record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस