राज्यात पावसाचा जोर वाढला; विदर्भात अतिवृष्टी, नद्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 09:59 IST2025-07-27T09:56:37+5:302025-07-27T09:59:06+5:30
धरणे भरली, विसर्ग सुरू, मराठवाडा ओला चिंब, सांगली-कोल्हापूरसह साताऱ्यातही पावसाचा जोर, नवजाला १८८ मि. मी. ची नोंद

राज्यात पावसाचा जोर वाढला; विदर्भात अतिवृष्टी, नद्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यात संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर वाढला असून विविध ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह नाशिकला पावसाचे पुन्हा आगमन झाले असून संततधार पावसाने मराठवाडा चिंब झाला आहे.
विदर्भात सर्वदूर पाऊस असून सर्व जिल्हे सरासरीच्या पुढे गेले आहेत. नागपूरसह गडचिरोलीत चौथ्या दिवशीही रिपरिप सुरूच होती. पर्ल कोटाचा नदीचा पूर ओसरला असला तरी चार मार्ग बंदच होते. भंडारा, गोंदियात संततधार असून तीन तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील १७ मार्ग बंद, पुजारीटोला, कालीसरार धरणाचे दरवाजे उघडले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जाेर कायम आहे, सात महसूल मंडळांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अमरावती जिल्ह्यातही दोन मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
वर्धा जिल्ह्यात संततधार पावसामुळे निम्न वर्धा प्रकल्पाचे ५ दरवाजे प्रत्येकी ३० सेंटिमीटरने उघडण्यात आले. आर्वी तालुक्यातील उमरी व दहेगाव गोंडी प्रकल्प १०० टक्के भरल्याने सांडव्यावरून ओव्हरफ्लो सुरू आहे.
संततधार पावसाने मराठवाडा चिंब
नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस झाला असून अनेक प्रकल्प भरले आहेत. परभणी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर होता. पुणे जिल्ह्यातील दौंड व बंडगार्डन येथून विसर्ग वाढल्याने सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण ९५ टक्के भरले असून धरणातून विसर्ग सुरू आहे.
महाबळेश्वरला २२६ मिमी. पाऊस
कोल्हापूर, सांगलीला पावसाचा रात्रभर तडाखा असून धरणांची पाणी पातळी वाढली आहे. साताऱ्यात नवजाला १८८ तर महाबळेश्वरला २२६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
अवकाळीने पिकांची हानी, २६ कोटींच्या निधीस मंजुरी
पुणे : राज्यात फेब्रुवारी ते मे या काळात अवकाळीने ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या १ लाख ८७ हजार ५३.२१ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. त्यापोटी राज्य सरकारने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार निधी मंजूर केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर विभागात ६७ हजार ४६२ शेतकऱ्यांच्या ३४ हजार ५४२.४६ हेक्टर क्षेत्रासाठी ५९ कोटी ९८ लाख २० हजार, पुणे विभागात १ लाख ७ हजार ४६३ शेतकऱ्यांच्या ४५ हजार १२८.८८ हेक्टर क्षेत्रासाठी ८१ कोटी २७ लाख २७ हजार, नाशिक विभागात १ लाख ५ हजार १४७ शेतकऱ्यांच्या ४५ हजार ९३५.१६ हेक्टरसाठी ८५ कोटी ६७ लाख ८ हजार, कोकणातील १३ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या ४ हजार ४७३.६९ हेक्टर क्षेत्रासाठी ९ कोटी ३८ लाख २४ हजार, अमरावतीच्या ५४ ७२९ शेतकऱ्यांच्या ३६ १८९.८६ हेक्टर क्षेत्रासाठी ६६ कोटी १९ लाख ११ हजार आणि नागपूर विभागातील ५० १९४ शेतकऱ्यांच्या २०७८३.१६ हेक्टरसाठी ३४ कोटी ९१ लाख ६३ हजार मंजूर केले आहेत.