Join us  

मान्सून जोर पकडतोय; गोव्यासह कोकणात अतिवृष्टीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 5:50 PM

मुंबईसह राज्यात दाखल झालेला मान्सून हळूहळू का होईना जोर धरत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथील बहुतांश ठिकाणी जलधारा कोसळत असतानाच मंगळवारी सकाळपासून मुंबईत देखील पावसाने चांगलाच जोर पकडला आहे.

 

मुंबई : मुंबईसह राज्यात दाखल झालेला मान्सून हळूहळू का होईना जोर धरत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथील बहुतांश ठिकाणी जलधारा कोसळत असतानाच मंगळवारी सकाळपासून मुंबईत देखील पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. मुंबईत मंगळवारी सकाळी पावसाने चांगलाच जोर पकडला होता. सकाळी साडे अकरानंतर  पावसाचा जोर ओसरला; आणि दुपारी कडाक्याचे ऊनं पडले. दरम्यान, काही ठिकाणी पाऊस जोर पकडत असतानाच १७ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. १८ जून रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मुंबईचा विचार करता बुधवारसह गुरुवारी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. मुसळधार ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ जूनच्या सकाळी आठे वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार, कुलाबा येथे ५२ आणि सांताक्रूझ येथे ३७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. १६ जूनपर्यंत कुलाबा येथे ३०३ तर सांताक्रूझ येथे २४५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार, पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत असतानाच पडझडीच्या घटना देखील घडत होत्या. शहरात ३, पश्चिम उपनगरात ६ अशा एकूण ९ ठिकाणी झाडे, झाडांच्या फांद्या कोसळल्या. झाडे आणि फांद्या उचलण्याचे काम वेगाने सुरु करण्यात आले. सुदैवाने या घटनांत कोणी जखमी झाले नाही. शहरात ४, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात १ अशा ८ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. येथे संबंधित विद्युत पुरवठा यंत्रणांना कळवून मदतकार्य रवाना करण्यात आले. तर हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मान्सून पश्चिम मध्य प्रदेशच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे. पूर्व मध्य प्रदेशाच्या बहुतांश भागात, पूर्व उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात मान्सून दाखल झाला आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :मानसून स्पेशलपाऊसमुंबईमहाराष्ट्र