Join us  

मान्सूनचे १ जूनला केरळात आगमन;अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 3:14 AM

मान्सूनचे गुरुवारी बंगालच्या उपसागरात आणखी काही भागांत आगमन झाले आहे.

पुणे/मुंबई : मान्सूनचे आगमन नेहमीप्रमाणे केरळ येथे १ जूनला होणार असल्याची आनंदवार्ता हवामान विभागाने दिली आहे़ अरबी समुद्राच्या दक्षिण पूर्व समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून, हे वातावरण मान्सून पुढे सरकण्यास पोषक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मान्सूनचे गुरुवारी बंगालच्या उपसागरात आणखी काही भागांत आगमन झाले आहे. मालदीव, कोमोरीन क्षेत्रात आगमनाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण असून, ४८ तासांत त्याचे त्या भागात आगमन होण्याची शक्यता आहे़ अरबी समुद्रातील पूर्व मध्य अरब समुद्राच्या भागात ३१ मे ते ४ जूनदरम्यान कमी दाबाचे क्षेत्र ४८ तासांत तयार होण्याची शक्यता आहे़

४ जूननंतर त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊन ते दक्षिण ओमान आणि पूर्व येमेन देशाच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. नेमकी ही स्थिती मान्सूनच्या प्रवासाला पूरक ठरणार आहे. यापूर्वी हवामान विभागाने मान्सून ५ जूनला केरळला येण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविला होता़

परतीचा प्रवास ८ आॅक्टोबरपासून

यंदा राज्यात पाऊस सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त असेल. 01 ते २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात कोसळण्याची शक्यता आहे. ‘अल निनो’चा प्रभाव पडणार नाही. मराठवाड्यात सर्वसामान्य, तर विदर्भ येथे सामान्यापेक्षा कमी पाऊस होईल. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात 11 जून रोजी पाऊस येईल. नेहमीपेक्षा जास्त रेंगाळून ८ आॅक्टोबरला त्याचा परतीचा प्रवास सुरू होईल, असा अंदाज आहे.

टॅग्स :पाऊसमहाराष्ट्र