Monorail Mumbai halted video: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोनो रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना त्रास सोसावा लागला. चेंबूरच्या दिशेने निघालेली मोनो रेल्वे वडाळा परिसरातच अचानक बंद पडली. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशी अडकले. भर पावसाता प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आणि चेंबूरकडून आलेली मोनो रेल्वे थांबवून त्यात बसवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मोनो रेल्वे चेंबूरच्या दिशेने जात होती. वडाळा स्थानकात पोहचण्यापूर्वीच मोनो रेल्वे अचानक बंद पडली. पावसाचा जोर वाढलेल्या असतानाच अचानक मोनो रेल्वे बंद पडल्याने प्रवाशी घाबरले.
मोनो बंद पडल्याची माहिती कळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. चेंबूरकडून आलेली मोनो रेल्वे थांबवण्यात आली. बंद पडलेल्या मोनो रेल्वेतून लोकांना बाहेर काढण्यात आले आणि दुसऱ्या मोनोमध्ये बसवण्यात आले.
तांत्रिक बिघाडामुळे मोनो रेल्वेची सेवा विस्कळीत
तांत्रिक बिघाड झाल्याने मोनो रेल्वे बंद पडली होती. वीज पुरवठ्याची समस्या असल्याचे समजते. महिनाभरापूर्वीच मोनो रेल्वे बंद पडल्याची घटना घडली होती. अचानक वीज पुरवठा बंद झाल्याने मोनो एका बाजूने कलंडली होती. त्यातून तब्बल ७५० लोक प्रवास करत होते.
अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली होती. महिनाभरातच दुसऱ्यांदा मोनो बंद पडण्याची घटना घडली आहे.