मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 06:38 IST2025-08-21T06:38:04+5:302025-08-21T06:38:14+5:30

अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तैनाती, आपत्कालीन खिडक्यांची तपासणीही होणार

Mono will stop if it is overloaded! Decision not to let the train go ahead if there are more passengers | मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय

मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मोनो मार्गिकेवर अतिरिक्त प्रवासी संख्येमुळे मंगळवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर १०४ टनांपेक्षा अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. तसेच क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्यास प्रवाशांना गाडीतून सुरक्षितपणे उतरवून नंतरच गाडी पुढे सोडण्यात येणार आहे.

मोनो गाडीची प्रवासी क्षमता १०४ टन आहे. त्यानंतरीही दहा वर्षांपासून या गाड्या सेवेत आहेत. तसेच त्यांच्या दुरुस्तीमध्ये येणाऱ्या अडथळ्यांमुळे त्यांची क्षमता घटली आहे. त्यामुळे मोनो मार्गावर गाडी ओव्हरलोड होऊन भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी एमएमआरडीएने अंशकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून गाड्यांची प्रवासी क्षमता १०२ ते १०४ टनांपर्यंत राहील याची काळजी घेतली जाणार आहे. मोनोमध्ये आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी काय करावे, सुरक्षित मार्ग कुठला आहे, याचे माहिती फलक लावलेले आहेत. त्यात वाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी दिली.

मंगळवारी काय घडले?

मोनो गाडीची प्रवासी क्षमता ५६२ आहे. मंगळवारी बंद पडलेल्या एका गाडीत ५८२, तर दुसऱ्या गाडीत ५६६ प्रवासी होते. त्या ओव्हरलोड दर्शविणारे सेन्सर आहेत. ही गाडी निर्धारित वेगाला धावू शकेल, अशी सूचना यंत्रणेने दिल्याने गाडी चालविण्यात आली. मात्र वळणाच्या ठिकाणी गाडी थोडीशी झुकल्याने पॉवर रेल आणि करंट कलेक्टर यांच्यातील यांत्रिक संपर्क तुटला. त्यातून गाडीचे ब्रेक लागून ती एकाच जागी थांबली. हे ब्रेक पुन्हा खुले न झाल्याने एक गाडी ओढून स्थानकात नेता आली नाही. अग्निशमन विभागाच्या साह्याने प्रवाशांची सुटका करावी लागली, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तैनाती

प्रत्येक गाडीमध्ये एक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आला आहे. त्याची आतील गर्दीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असेल. मोनो पायलटसह एक टेक्निशियनही गाडीत पाठवला जाणार आहे.

आपत्कालीन खिडक्यांची तपासणी

प्रत्येक मोनोरेलमध्ये ४ डबे असून प्रत्येक डब्यात २ व्हेंटिलेशन खिडक्या आहेत. त्यातून एका गाडीत ८ व्हेंटिलेशन खिडक्या आहेत. या खिडक्यांची तातडीने तपासणी करून त्यावर स्पष्ट लेबलिंग करण्याचे आदेश दिले आहे.

लोकल सेवेचा अर्धा तास ‘लेटमार्क’

मुंबईसह उपनगरांमध्ये मंगळवारी झालेल्या जोरधारांचा बुधवारीही रेल्वे सेवांना फटका बसला. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने तांत्रिक बिघाडांमुळे रेल्वे सेवांवर परिणाम झाला. मध्य रेल्वेवर फेऱ्या २० ते २५ मिनिटांच्या उशिराने तर पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावरच्या सेवा २० मिनिटांच्या अंतराने सुरू होत्या. पश्चिम रेल्वेची सुरुवात १२ सेवा रद्द करून झाली. या मार्गावर दिवसभरात ३० पेक्षा जास्त फेऱ्या रद्द करण्यात आल्या.  दिवसभरात मध्य रेल्वेच्या सुमारे १०० लोकल आणि ८ एक्स्प्रेस रद्द केल्या. 
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मध्य रेल्वेवर मंगळवारी अनेक रेल्वे कर्मचारी आणि मोटरमनदेखील अडकले होते. बुधवारी उशिरापर्यंत त्यांच्यासह लोकल कारशेडपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू होते दरम्यान, लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या तर पश्चिम रेल्वेवर वसई स्टेशनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे जलद मार्गावरची वाहतूक विलंबाने सुरू होती.  तर  वाशी स्थानकात बुधवारी दुपारी तांत्रिक बिघाड झाल्याने डाऊन दिशेची एक लोकल अडकली. परिणामी मागील गाड्याही उशिराने धावल्या. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकलची वाहतूक  कोळमडली होती.

Web Title: Mono will stop if it is overloaded! Decision not to let the train go ahead if there are more passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.