Join us
Daily Top 2Weekly Top 5

चेंबूर ते सातरस्ता दरम्यानची मोनो सेवा सुधारणार; सुरक्षा चाचण्यांवर देणार भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 09:42 IST

सिग्नल यंत्रणा, नव्या गाड्यांच्या तपासणीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक (सात रस्ता) या मोनो रेल्वेमार्गावरील अपडेटेड सिग्नल यंत्रणेची तपासणी करण्यासाठी आता रेल्वे सुरक्षा अभियंता विभागाचे निवृत्त मुख्य आयुक्त पी. एस. बघेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या तपासणीसह एमएमआरडीएकडून मोनो मार्गिकेवर खरेदी करण्यात येत असलेल्या नव्या गाड्यांची तपासणी आणि त्यांच्या प्रमाणीकरणाचे कामही ते करणार आहेत.

ही मोनो मार्गिका २० कि.मी. लांबीची असून त्यावर १७ स्थानके आहेत. यावर सद्य:स्थितीत केवळ सहा गाड्या धावत असून त्यांची फेरी दर १८ मिनिटांनी आहे. या फेऱ्यांची वारंवारिता वाढावी यासाठी एमएमआरडीएकडून आणखी १० गाड्यांची खरेदी केली जाणार आहे. तसेच मोनोची सिग्नलिंग यंत्रणा जुनी झाल्याने त्यात सुधारणा करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. 

एमएमआरडीएकडून खरेदी करण्यात आलेल्या १० गाड्यांमधील पहिली गाडी वडाळा येथील आगारामध्ये दाखल झाली असून, महामुंबई मेट्रो संचलन मंडळाद्वारे या गाडीची चाचणी घेतली जात आहे. त्यामध्ये या गाडीचे ऑसिलेशन तसेच सुरक्षा चाचण्यांवर भर आहे. या चाचण्या पूर्ण झाल्यावर या मोनो मार्गिकेची कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी यांच्याकडून तपासणी करून सुरक्षा प्रमाणपत्र मिळविले जाणार आहे. त्यानंतर नवी गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.

  • १० खरेदी केल्या जाणाऱ्या गाड्या
  • ५९०कोटी कंत्राटाची किंमत 
  • ४डबे एका गाडीला 
  • ५८.९ कोटी रुपये प्रत्येक गाडीची किंमत

सीएमआरएस पथकाला बोलाविणार

सीएमआरएसकडून तपासणीपूर्वी आता बघेल यांच्याकडूनही या सर्व गाड्यांची तपासणी प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतरच या गाड्यांच्या तपासणीसाठी सीएमआरएस पथकाला पाचारण केले जाईल. सीएमआरएस पथकाकडून तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार सुधारणा करून उर्वरित गाड्या मुंबईत दाखल होणार आहेत.

५ मिनिटांनी दुसरी मोनो

- सद्य:स्थितीत मोनो मार्गिकेवर ८ गाड्या उपलब्ध आहेत. त्यामधील ६ गाड्यांतून प्रत्यक्षात वाहतूक सेवा दिली जाते. दरदिवशी सहा गाड्यांमार्फत ११८ फेऱ्या होत आहेत. - मात्र गाडीची १८ मिनिटे प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रवाशांनी मोनो प्रवासाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यामुळे नव्या गाड्या सेवेत दाखल झाल्यानंतर मोनो मार्गिकेवरील गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या २५० पर्यंत पोहोचून दोन फेऱ्यांमधील कालावधी पाच मिनिटांवर येईल आणि प्रवाशांची सोय होईल, असा अंदाज आहे.

टॅग्स :मोनो रेल्वेचेंबूरमुंबई