मनी लाँड्रिंग प्रकरण; राणा अय्युब यांना विमानतळावर रोखले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 08:00 IST2022-03-31T07:59:13+5:302022-03-31T08:00:10+5:30
मनी लाँड्रिंग प्रकरण; परदेशात जाण्यासाठी परवानगी आवश्यक

मनी लाँड्रिंग प्रकरण; राणा अय्युब यांना विमानतळावर रोखले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एका परिषदेसाठी लंडनला निघालेल्या पत्रकार व गुजरात फाईल्सच्या लेखिका राणा अय्युब यांना बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणी जारी केलेल्या लूकआऊट नोटीसच्या आधारे परदेशात जाण्यापासून मुंबईविमानतळावर रोखले.
राणा यांनी कोरोना काळात मदतनिधी गोळा करताना विदेशी निधी नियमांचे कथित उल्लंघन केल्याने चौकशी सुरू आहे. गाझियाबाद पोलिसांनी सप्टेंबर २०२१ मध्ये गुन्हा दाखल केला होता. दिल्लीतील ईडी अधिकाऱ्यांमार्फत तपास सुरू आहे. ईडीने अय्युब यांना १ एप्रिलला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. परदेशात जाण्यासाठी त्यांना काेर्टाची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना राेखल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ईडीने त्यांच्या १.७७ कोटी रुपयांहून अधिक ठेवी तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या होत्या.
लोकशाहीवर व्याख्यान
राणा अय्युब यांनी, ट्विट करत दिलेल्या माहितीत, पत्रकारांना धमकाविण्याच्या विषयावर ‘आयसीएफजे’मध्ये व्याख्यानासाठी मी लंडनला जात असताना मला थांबवण्यात आले. जर्नालिझम फेस्टिव्हलमध्ये भारतीय लोकशाहीवर माझे मुख्य व्याख्यान झाल्यानंतर मी इटलीला जाणार होते, असे नमूद केले आहे.