‘त्यांच्या’साठी सोमवारची सकाळ अविस्मरणीय; मिळाले हक्काचे घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:24 IST2026-03-17T12:24:27+5:302026-03-17T12:24:38+5:30

नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ८६४ कुटुंबांना नव्या घरांच्या चाव्या वाटप

Monday morning is unforgettable for them they got their rightful home | ‘त्यांच्या’साठी सोमवारची सकाळ अविस्मरणीय; मिळाले हक्काचे घर

‘त्यांच्या’साठी सोमवारची सकाळ अविस्मरणीय; मिळाले हक्काचे घर


मुंबई : दादर येथील नायगाव परिसरातील शंभर वर्षांहून अधिक जुन्या बीडीडी चाळीत आयुष्य घालवलेल्या रहिवाशांसाठी सोमवारची सकाळ अविस्मरणीय ठरली. अनेकांच्या आनंदाला पारावार उरला नाही, तर भावना व्यक्त करताना काहींचा कंठ दाटून आला.

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ८६४ कुटुंबांना नव्या घरांच्या चाव्या देण्याचा सोहळा सोमवारी पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात प्रातिनिधिक १४ कुटुंबांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नायगाव येथील पुनर्वसन इमारत क्रमांक ७ आणि ८ च्या प्रांगणात करण्यात आले होते. त्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता तसेच उपस्थित रहिवाशांसाठी नाष्टा व चहाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच अनेक ज्येष्ठ नागरिक मंडपात दाखल झाले होते. झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजवलेले प्रवेशद्वार, इमारतीखाली काढलेली रंगीबेरंगी रांगोळी आणि लॉबीमधील नावांच्या पाट्यांची सजावट पाहून वातावरण उत्सवी झाले होते.

ही कल्पनाच खूप सुखावह
३७ वर्षीय गृहिणी आरती बाबर यादेखील जन्मापासून बीडीडी चाळ क्रमांक १७-बीमध्ये राहतात. ‘आता नव्या इमारतीत १५व्या मजल्यावर राहायला जाणार असल्याचा आनंद काही औरच आहे. १६० चौ. फूट घरांतून ५०० चौ. फूट घरात जाणार, ही कल्पनाच खूप सुखावह आहे’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

अनेकांना अश्रू अनावर
तळमजला आणि तीन माळ्यांच्या १६० चौ. फूट खोलीत आयुष्य घालवलेल्या अनेक कुटुंबांनी जेव्हा २३ मजली इमारतीतील लॉबीमध्ये स्वतःचे नाव पाहिले, तेव्हा आनंदाश्रू अनावर झाले. ६० वर्षीय गणेश हजारे हे जन्मापासून बीडीडी चाळीतच राहिले आहेत. ते पत्नी स्वाती आणि दोन कन्या रूची व श्रेया यांच्यासह कार्यक्रमाला उपस्थित होते. “मी जन्मापासून बीडीडी चाळीतच वाढलो,” असे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. त्यांच्या पत्नी स्वाती म्हणाल्या की, २५ वर्षांपूर्वी (लग्नानंतर) त्या बीडीडी चाळीत राहायला आल्या. “नव्या घरात जाणार असल्याचा आनंद आम्हाला शब्दांत व्यक्त करता येत नाही.” तर कन्या रूची म्हणाली, “आता मी माझ्या मित्रमैत्रिणींना अभिमानाने सांगू शकेन की आम्ही ‘टू-बीएचके’मध्ये राहतो.” 

‘म्हाडा’कडे देखभालीची जबाबदारी 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, १९ तारखेला गुढी उभारण्याचा आनंद रहिवाशांना मिळणार आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील इमारतींचा १२ वर्षांचा देखभाल दुरुस्ती खर्च म्हाडा करणार आहे. क्लस्टर, एसआरए सारख्या योजनेच्या माध्यमातून लाखो लोकांना घरे मिळत आहेत. गृहनिर्माण क्षेत्रासाठी शासनाने क्रांतिकारी निर्णय घेतला असून, गृहनिर्माण धोरणाच्या माध्यमातून ७० कोटींची गुंतवणूक व तीस लाख लोकांना पर्यावरणपूरक घरे उपलब्ध होणार आहे.

Web Title : खुशी भरा सोमवार: बीडीडी चॉल निवासियों का नया घर का सपना हुआ साकार

Web Summary : मुंबई के बीडीडी चॉल के निवासियों ने पुराने भवनों में वर्षों बिताने के बाद नए घरों की चाबी पाकर जश्न मनाया। इस कार्यक्रम ने पुनर्विकास परियोजना में एक महत्वपूर्ण मील का पत्थर चिह्नित किया, क्योंकि परिवारों ने बेहतर जीवन स्थितियों और उज्जवल भविष्य की उम्मीद की।

Web Title : Joyful Monday: BDD Chawl Residents Realize Dream of New Homes

Web Summary : Mumbai's BDD Chawl residents celebrated receiving keys to new homes after years in old buildings. The event marked a significant milestone in the redevelopment project, bringing joy and tears of happiness as families looked forward to improved living conditions and a brighter future.