Join us
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा विभागात मोहित कंबोजांचा हस्तक्षेप: अंबादास दानवे यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 08:52 IST

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना दानवे यांनी राज्याचा जलसंपदा विभाग कंबोज चालवितात, असा आरोप केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जलसंपदा विभागातील बडा अधिकारी आणि भाजप नेते मोहित कंबोज यांचे मोठे साटेलोटे आहे. जलसंधारण आणि जलसंपदा विभागातील नवीन धरणाच्या प्रकल्पांचे निर्णय ते घेतात. त्या विभागात हस्तक्षेप करून निर्णय घेणारे कंबोज आणि त्या अधिकाऱ्याच्या संभाषणाची सीडीआर तपासण्यात यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी केली.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना दानवे यांनी राज्याचा जलसंपदा विभाग कंबोज चालवितात, असा आरोप केला. विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर नावाचे अधिकारी त्यांना विचारल्याशिवाय निर्णय घेत नाहीत. कोणत्या कामात त्यांनी काय केले याचे पुरावे आहेत, असेही दानवे यांनी सांगितले. कानडी कंडक्टरने मराठी अल्पवयीन मुलीवर केलेल्या प्रकारामुळे त्याला मारहाण करण्यात आली. त्याच्यामागे कर्नाटक राज्य उभे राहिले. मात्र, महाराष्ट्र सरकारने कोणतीही भूमिका घेतली नाही. बेळगाव, निपाणी हे भाग आपले आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी ममत्व असले पाहिजे. बेळगाव कर्नाटक सीमावादावर स्थापन केलेल्या समितीमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळेच असे प्रकार होत असल्याची टीका दानवे यांनी केली. 

 

टॅग्स :विधान परिषदअंबादास दानवे