सांगली - येथील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने दिले जाणारे विष्णुदास भावे नाट्य गौरव पदक यंदा ज्येष्ठ अभिनेते, नाटककार मोहन जोशी यांना जाहीर करण्यात आले आहे. येत्या ५ नोव्हेंबररोजी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्याहस्ते हे पदक त्यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. कराळे म्हणाले की, प्रतिवर्षी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणा-या श्रेष्ठ कलाकारास विष्णुदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते. आजपर्यंंत ५१ दिग्गज रंगकर्मींना हे पदक प्रदान करण्यात आले आहे. यंदाचे ५२ वे पदक जयंत सावरकर यांना जाहीर करण्यात आले आहे. रंगभूमी क्षेत्रातील हे मानाचे पदक असून, आजवर बालगंधर्व, केशवराव दाते, आचार्य अत्रे यांच्यापासून ते जयंत सावरकर यांच्यापर्यंत अनेक दिग्गज रंगकर्मी, नाटककार, लेखकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गौरवपदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि २५ हजार रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.जोशी यांचा जन्म १२ जुलै १९५३ रोजी बेंगलोर येथे झाला. महाविद्यालयीनय शिक्षणानंतर पुणे येथील किर्लोस्कर ट्रान्स्पोर्टमध्ये सेवा करीत असतानाच अभिनयाकडे ओढा वाढला. भरत नाट्य मंदिरात बालनाट्य, एकांकिका, नाटक यामाध्यमातून त्यांनी आपल्यातील कलाकाराला न्याय दिला. टूनटून नागरी- खणखण राजा या भरतनाट्य मंदिराच्या बालनाट्यापासून सुरुवात झाली. महाविद्यालयातर्फे ह्यपेटली आहे मशाल या नाटकातून त्यांनी यशस्वी वाटचालीस सुरुवात केली. पुण्यातीलच प्रायोगिक नाटके सादर करणा-या संस्थांच्या गार्बो , ह्यएक शून्य बाजीराव या प्रायोगिक नाटकात त्यांनी सहभाग घेतला. राज्य नाट्य स्पर्धेतही त्यांनी अनेक पारितोषिक मिळविली. हौशी रंगभूमीवर मोरुची मावशी या नाटकातून एक विनोदी कलाकार रंगभूमीला मिळाला. नाथ हा माझा, प्रेमाच्या गावा जावे, आसू आणि हासू ही त्यांची नाटके गाजली. या यशानंतर त्यांनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला आणि अनेक भूमिका गाजविल्या. आजवर त्यांनी १0२ मराठी तर १७२ हिंदी चित्रपटात काम केले. सध्या ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या या सर्व कामगिरीची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रविवारी ५ नोव्हेंबर रोजी त्यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे, असे कराळे म्हणाले.
मोहन जोशी यांना विष्णुदास भावे नाट्य गौरव पदक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 17:01 IST