Modi's initiation to hide farmer suicides in other states - Sachin Sawant | शेतकरी आत्महत्या लपवण्याची दीक्षा मोदींकडूनच इतर राज्यात- सचिन सावंत

शेतकरी आत्महत्या लपवण्याची दीक्षा मोदींकडूनच इतर राज्यात- सचिन सावंत

मुंबई- महत्त्वाच्या विषयांवरील आकडेवारी लपवून सरकारचे अपयश झाकण्याचे मोदी सरकारचे लोण शेतकरी आत्महत्या लपवण्यापर्यंत पोहोचले आहे. काही राज्य सरकार शेतकरी आत्महत्यांची माहिती देत नसल्याने त्याचा अहवाल देण्यास एनसीआरबीने असमर्थता दर्शवल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले आहे. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून शेतकरी आत्महत्या लपवण्याची ही दीक्षा इतर राज्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडूनच घेतली असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

सावंत पुढे म्हणाले की, देशात अनेक यंत्रणा उभारल्या त्या योग्य ती माहिती केंद्र सरकारला मिळावी आणि त्यातून धोरणात्मक निर्णय घेण्यास त्याची मदत व्हावी यासाठी. परंतु मोदी सरकार आल्यापासून या यंत्रणाच कुचकामी ठरत आहेत, त्याचे मूळ खोट्या गुजरात मॉडेलमध्ये दडलेले आहे. गुजरात सरकारने शेतकरी आत्महत्या लपवण्याचे काम मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार असताना केले आहे. आता जर काही राज्य सरकारांकडून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची माहिती दिली जात नसेल तर दोष त्यांचा नाही, तो दोष मोदींच्या आचाराची, विचाराची दीक्षा इतर राज्यांनी घेतल्यामुळे आहे.

गुजरातमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतच नाहीत, अशी धादांत खोटी माहिती तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व त्यांचे सरकार जाहीरपणे सांगत होते. 30 मार्च 2014 रोजी अमरावती येथे झालेल्या जाहीर सभेत मोदींनी शेतकरी आत्महत्या व गरीबीचा प्रश्न उपस्थित करून मागील तीन वर्षात गुजरातमध्ये एकाही शेतकऱ्यांने आत्महत्या केली नाही असे म्हटले होते, त्याच दिवशी भाजपचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष खा. पियुष गोयल यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनाही गुजरातमध्ये शेतकरी आत्महत्या झाल्या नसल्याचा दावा केला होता. त्यांचा हा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ३१ मार्च २०१४ रोजी पुराव्यानिशी खोडून काढत गुजरातमध्ये शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी दिली होती. गुजरात विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नाच्या उत्तरातच शेतकरी आत्महत्यांची माहिती होती पण मोदी सरकारने ती लपवून ठेवली होती. पुढे तर २०१७ मध्ये केंद्रीय गृह विभागाने २०१३ ते २०१५ मध्ये गुजरात मध्ये १४८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे कबूल केले.

महाराष्ट्रासह इतर काही राज्य सरकार अशी माहिती आजही देतच आहेत. त्यामुळे खरी वस्तुस्थिती समोर येण्यास मदत होतेच पण धोरणात्मक निर्णय ही घेता येतात ‌ मोदी सरकारला वस्तुस्थिती लोकांपुढे येऊच द्यायची नाही. मोदींचे गुजरात मॉडेल हे लपवाछपवी चे मॉडेल होते. आज केंद्र सरकार त्याच पद्धतीने चालत आहे. हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सावंत म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Modi's initiation to hide farmer suicides in other states - Sachin Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.