Join us
Daily Top 2Weekly Top 5

'15 लाख देतो असं मोदीजी कधीही म्हणाले नाहीत, हवं तर व्हिडीओ क्लिप बघा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 13:51 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 च्या लोकसभा निवडणुकांवेळी देशातील प्रत्येक व्यक्तीच्या बँक खात्यात 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधीही 15 लाख रुपये देतो, असे म्हटले नाही. मोदींनी काळ्या पैशाचं आर्थिक गणित समाजावून सांगताना, 15 लाख रुपये प्रत्येक कुटुंबांच्या खात्यात जमा होऊ शकतात, असे म्हटल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी 15 लाख रुपयांच्या देणीबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 च्या लोकसभा निवडणुकांवेळी देशातील प्रत्येक व्यक्तीच्या बँक खात्यात 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे गेल्या 4 वर्षांपासून मोदींच्या या घोषणेवरुन नेहमीच भाजपाला आणि भाजपा नेत्यांना तोंडघशी पडावे लागत आहे. विशेष म्हणजे मोदींकडेही या प्रश्नावर ठोस उत्तर नाही. तर, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनीही 15 लाख रुपयांचे आश्वासन म्हणजे चुनावी जुमला असल्याचे म्हटले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 लाख रुपयांच्या घोषणेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मोदींनी कधीधी 15 लाख रुपये देणार असल्याचे म्हटले नाही. स्वीस बँकेत असलेल्या काळ्या पैशासंदर्भात बोलताना, मोदींनी 15 लाख रुपयांचे गणित मांडले होते. विदेशात असलेला काळा पैसा देशात परत आल्यास, देशातील प्रत्येक व्यक्ती किंवा कुटुंबांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील, एवढा पैसा देशात येईल, असे मोदींनी म्हटले होते. आपण, मोदींची कुठलिही व्हिडीओ क्लीप काढून पाहा. 15 लाख रुपये देतो, असे मोदी कधीही म्हणाले नसल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोदींचे समर्थन केले आहे. 

दरम्यान, मोदींच्या या घोषणेवरुन नेहमीच सोशल मीडियात भाजपला ट्रोल केले जाते. तसेच प्रत्येकाकडून 15 लाख रुपयांचा प्रश्न भाजपा नेत्यांना विचारला जातो. त्यामुळे अनेकदा भाजपा नेत्यांना या प्रश्नावर चुप्पी साधावी लागते. मात्र, फडणवीस यांनी या प्रश्नाचं वर्गीकरण करत स्पष्टीकर दिलं आहे.   

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपालोकसभा निवडणूक