Join us  

मोदींमुळेच जगाला योगाची ओळख, नांदेडमध्ये मुख्यमंत्री अन् रामदेव बाबांचा जुळून आला 'योग'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 8:43 AM

नांदेड येथील मामा चौक येथील मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरू रामदेव बाबा यांच्यासमवेत योगासने केली.

मुंबई - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारंकडणधील रांची येथे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये योगासने केली. योग ही आपल्या देशाची संस्कृती आणि साधन आहे. जगाला योगसाधनेची ओळख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून दिली. मोदींच्याच प्रयत्नांमुळे 21 जुन हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. आज पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. 

नांदेड येथील मामा चौक येथील मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरू रामदेव बाबा यांच्यासमवेत योगासने केली. तसेच योगाचे महत्त्व सांगताना, शरीर आणि मनाला दुरूस्त करणारी प्राचीन संस्कृती म्हणजे योगासन असल्याचंही फडणवीस यांनी म्हटले. यावेळी, हजारोंच्या संख्येने विद्यार्थी, नागरिक आणि योगासनप्रेमी हजर होते. येथील मैदानावर एक लाख नागरिकांच्या योगासनाची व्यवस्था करण्यात आली होती. बाबा रामदेव यांनीही योगाची लक्षणीय प्रात्यक्षिके करून उपस्थितांची मने जिंकली. तर, जागतिक योग दिवस साजरा करत असल्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी जाते, असे म्हणत मोदींचे आभार मानले. 

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथेही योगाची प्रात्यक्षिके करुन योग दिन साजरा करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या मार्गदर्शनात येथे योगासने करण्यात आली. यावेळी, शिल्पा शेट्टी यांनीही योगाचे धडे देताना, योग साधनेचे महत्त्व समजावून सांगितले. मुंबईतील मरीन लाईन आणि नेव्ही डॉकयॉर्ड येथे आयएनएस विराट या युद्ध नौकेवरही योगासने करुन योगदिवस साजरा करण्यात आला. 

नांदेडमध्ये रामदेवबाबा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्यासह लाखो योगसाधकांची उपस्थिती. 

टॅग्स :मुंबईयोगदेवेंद्र फडणवीसरामदेव बाबा