Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरची आधुनिक औषधे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर; टाटा मेमोरियल सेंटरच्या  अभ्यासाचा निष्कर्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 08:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : डोके व मानेच्या कर्करोगावरील आधुनिक औषधे भारतासह जगभरातील बहुसंख्य नागरिकांना परवडत नाहीत. हे टाटा ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : डोके व मानेच्या कर्करोगावरील आधुनिक औषधे भारतासह जगभरातील बहुसंख्य नागरिकांना परवडत नाहीत. हे टाटा मेमोरियल सेंटर (टीएमसी) आणि ॲक्ट्रॅक्ट यांनी आंतरराष्ट्रीय ‘हेड ॲण्ड नेक’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध केलेल्या महत्त्वपूर्ण अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. कॅन्सरवरील औषधे स्वस्त दरात मिळावीत म्हणून अनेक संशोधकांकडून प्रयत्न सुरू आहेत. 

अभ्यासात भारत, अमेरिका, युनायटेड किंगडमसह सात देशांतील आधुनिक कर्करोग औषधांच्या किमतींची तुलना केली आहे. इम्युनोथेरपी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नव्या उपचारपद्धती अत्यंत महाग असून बहुतांश कुटुंबांसाठी त्या परवडण्यासारख्या नसल्याचे निष्कर्षात नमूद केले आहे. भारतामध्ये डोके व मान कर्करोगाचे प्रमाण जास्त असून, त्यांच्यात तंबाखू, सुपारी (अरेका नट) आणि मद्यपानाचे व्यसन असल्याचे स्पष्ट झाले. 

विकसित देशांतही आर्थिकदृष्ट्या बोजा संशोधनानुसार, भारतात पेम्ब्रोलिझुमॅबच्या सहा महिन्यांच्या उपचाराचा खर्च सरासरी मासिक उत्पन्नाच्या ८० पट आहे, तर निवोलुमॅबचा खर्च २० पटांपेक्षा अधिक आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही अशीच परिस्थिती आहे. अमेरिका आणि युनायटेड किंगडमसारख्या  देशांतही ही औषधे आर्थिकदृष्ट्या मोठा बोजा ठरतात. अभ्यासातील कोणत्याही देशात ही औषधे खऱ्या अर्थाने परवडणारी नाहीत, असे नमूद करण्यात आले आहे.

‘टार्गेटेड’मुळे मर्यादित खर्चात फायदेशीर उपचारांची सोयभारतात  ‘पेम्ब्रोलिझुमॅब’ उपचारासाठी लागणाऱ्या खर्चात १८ ते २२ रुग्णांवर कमी किमतीच्या टार्गेटेड थेरपीने उपचार करता येत असल्याचे निदर्शनास आले. या स्वस्त औषधांची परिणामकारकता इम्युनोथेरपीइतकी नसली, तरी मर्यादित खर्चात अधिक रुग्णांपर्यंत उपचार पोहोचविण्यास फायदेशीर आहेत.

हा उपचार खर्च अनेक वर्षांच्या उत्पन्नाइतकाअभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. अर्जुन सिंग (टीएमसी) यांनी सांगितले की , इम्युनोथेरपी केवळ महाग नाही, तर ती बहुतांश कुटुंबांच्या पूर्णतः आवाक्याबाहेर आहे. भारतात सहा महिन्यांच्या उपचाराचा खर्च अनेक वर्षांच्या उत्पन्नाइतका असू शकतो. समस्या वैद्यकीय प्रगतीची नसून औषधांच्या अतिशय उच्च किमतीची आहे.

बहुतांश लोक उपचारासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करतात. एवढा प्रचंड खर्च कुटुंबांना गरिबीत ढकलू शकतो. डोके व मान कर्करोगामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी प्रतिबंध, लवकर निदान आणि परवडणारे उपचार हेच सर्वांत प्रभावी उपाय आहेत. केवळ महागडी औषधे हा प्रश्न सोडवू शकत नाहीत. डॉ. पंकज चतुर्वेदी, सहलेखक आणि संचालक, ॲक्ट्रॅक.

English
हिंदी सारांश
Web Title : Cancer drugs unaffordable for most, says Tata Memorial study.

Web Summary : Modern head and neck cancer drugs are too expensive for most, a Tata Memorial Centre study reveals. Immunotherapy costs are prohibitive in India and globally. Cheaper targeted therapies offer a more accessible alternative, though less effective, for wider treatment access.
टॅग्स :आरोग्य