मॉडेल दिव्या पहुजाला सात वर्षांनंतर जामीन, गडोली बनावट चकमक प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 12:06 IST2023-06-29T12:06:05+5:302023-06-29T12:06:05+5:30
Divya Pahuja: उच्च न्यायालयाने गँगस्टर संदीप गडोलेच्या बनावट चकमक प्रकरणात हत्या व कट रचल्याबाबत आरोपी व मॉडेल दिव्या पहुजा हिची अटकेनंतर सात वर्षांनी जामिनावर सुटका केली.

मॉडेल दिव्या पहुजाला सात वर्षांनंतर जामीन, गडोली बनावट चकमक प्रकरण
मुंबई : बराच काळ कारागृहात खितपत पडलेल्या कच्चा कैद्यांचा सर्वोच्च न्यायालयाने व मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचा दाखला देत उच्च न्यायालयाने गँगस्टर संदीप गडोलेच्या बनावट चकमक प्रकरणात हत्या व कट रचल्याबाबत आरोपी व मॉडेल दिव्या पहुजा हिची अटकेनंतर सात वर्षांनी जामिनावर सुटका केली.
ती एक महिला आहे. सात वर्षे ती कारागृहात आहे आणि अल्पावधीत खटला पूर्ण होण्याची शक्यता नाही, असे निरीक्षण न्या. प्रकाश नाईक यांच्या एकलपीठाने दि. २० जूनच्या आदेशात नोंदविले आहे. मंगळवारी या आदेशाची प्रत उपलब्ध झाली.
दिव्याला अटक केली तेव्हा ती १८ वर्षांची होती. यापूर्वी फेब्रुवारी २०१९ व फेब्रुवारी २०२१ मध्ये उच्च न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला. खटला जलदगतीने घेण्याचे निर्देशही दिले. मात्र, आतापर्यंत सरकारी वकिलांनी एकाच साक्षीदाराची साक्ष नोंदविली. खटल्यात १७१ साक्षीदार आहेत. सर्व तथ्यांचा विचार करून अर्जदाराला काही अटी घालून जामीन मंजूर होऊ शकतो,’ असे न्यायालयाने म्हटले.
न्यायालयाने एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर तिची सुटका केली. याआधी न्यायालयाने याच कारणास्तव दिव्याची आई सोनिया पहुजाची व अन्य दोन आरोपींचीही जामिनावर सुटका केली आहे.
४१ प्रकरणांत गुन्हे
आरोपींना दि. १४ जुलै २०१६ रोजी पोलिसांनी अटक केली. २०१५च्या एका हत्येप्रकरणात गडोली पोलिसांना हवा होता. त्याच्यावर आणखी ४१ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुरगाव येथील रहिवासी पहुजा चकमकीच्या वेळी गडोलीच्या बरोबर होती. तिने त्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.