Join us  

मोबाइल, पाकीट चोरले; कार्डने एक लाख काढले, दोघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 5:59 PM

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे कर्तव्यावर असलेला जवानाने सुट्टीत गावी जाण्यासाठी विमानाने मुंबई गाठली.

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे कर्तव्यावर असलेला जवानाने सुट्टीत गावी जाण्यासाठी विमानाने मुंबई गाठली. सीएसएमटी रेल्वेस्थानकावर एक्स्प्रेसची वाट बघत असताना, दोन अनोळखी व्यक्तींनी त्याला बोलण्यात गुंतवून त्याचा मोबाइल तसेच पाकीट चोरले. एवढेच नाही तर त्याच्या डेबिट कार्डमधून एक लाख रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

सचिन आडे (२९, रा. नांदेड) हे सैन्य दलात शिपाई म्हणून पुलवामा येथे तैनात आहेत. ११ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान सुट्टी मंजूर झाल्याने त्यांना नांदेडला जायचे होते. त्यासाठी त्यांनी श्रीनगरहून विमानाने मुंबई गाठली. ११ मार्चला दुपारी ३:३० वाजता ते सीएसएमटी स्थानकात आले. ते तेथून ६:४५ च्या सुमारास सुटणाऱ्या एक्स्प्रेसच्या गाडीचे आरक्षण असल्याने तेथेच वाट बघत थांबले होते. त्यावेळी गाडीसंदर्भात त्यांनी एका प्रवाशाकडे चौकशी केली. त्याने ९ क्रमांकाच्या फलाटावर गाडी येणार असल्याचे सांगताच दोघेही बोलत फलाटावर गेले. काही वेळाने तेथे आणखी एक जण आला. त्यानेही गाडी कुठे जाणार, असल्याबाबत चौकशी करत संवाद सुरू केला. 

मोबाइलची बॅटरी उतरल्याने पॉवर बँक खरेदी करण्यासाठी ते स्थानकाबाहेर आले. तेथे दोघे त्यांच्याबरोबर आले. उद्यानाजवळ ते थांबले असताना भावाने फोन करून कुर्ला येथे बोलावले. ते तेथे जाण्यास निघाले असताना सोबत असलेल्या दोघांपैकी एकाने बॅग लावून देण्यास मदत करण्याच्या बहाण्याने मोबाइल आणि पैशांचे पाकीट चोरले.

तपास सुरू -

१) कुर्ला स्थानकात उतरताच, फोन करण्यासाठी मोबाइलचा शोध घेतला मात्र, तो आढळला नाही. पर्सही गायब असल्याने त्यांना धक्का बसला. 

२) डेबिट कार्ड ब्लॉक करण्यासाठी ग्राहक सेवेला कॉल करताच डेबिट कार्डमधून एक लाख काढल्याचे समजले. चौकशीत ऑपेरा हाउस येथील एटीएममधून हे पैसे काढल्याचे समोर आले. ३) याप्रकरणी त्यांनी ३० मार्चला तक्रार दिली. त्यानुसार एमआरए मार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीचोरी