लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने रविवारी पार पडलेल्या चिंतामणी गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात भोईवाडा आणि काळाचौकी पोलिसांच्या हद्दीत ६४ मोबाइल चोरीला गेले. याप्रकरणी २० गुन्हे दाखल झाले आहेत. ५ आरोपींना अटक करत पोलिसांनी ६ मोबाइल जप्त केले आहेत. चार सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल असून, याप्रकरणी दोन आरोपींना अटक करत दोन सोनसाखळ्या जप्त करण्यात पोलिसांना यश आले. अन्य गुन्ह्यांचा तपास पोलिस करीत आहेत.
दुसरीकडे ड्रोनच्या वापरामुळे पाच तरुणांविरोधात काळाचौकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ड्रोन उडविण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून, आरोपींकडील महागडे ड्रोन जप्त करण्यात आले आहेत. दुसरीकडे आगमन सोहळ्यावेळी अनेकांचे मोबाइल चोरी झाल्याने त्यांनी काळाचौकी, भोईवाडा पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही चिंचपोकळीतील गणेशमूर्ती आगमन सोहळ्यास मोठी गर्दी उसळली होती.
आकाशात पाच ड्रोन
१. जमाव नियंत्रणासाठी आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर काळाचौकी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोहळा सुरू असताना आकाशात पाच ड्रोन उडताना पोलिसांच्या लक्षात आले.२. तपासाअंती हे ड्रोन नीलेश देवळे, निखिल जाधव, अनिकेत मदामे, निनाद कोणापालकर आणि अभिषेक पाटील यांनी उडवल्याचे समोर आले. त्यांच्याकडे ड्रोन उडविण्यासाठी आवश्यक परवानग्या नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेत कारवाई करण्यात आली आहे.
२७१ मोबाइलची गेल्या वर्षी चोरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान आणि विशेषतः गर्दीच्या ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता ड्रोन वापरणे हे कायद्याने गुन्हा आहे. तर गेल्या वर्षी याच आगमन सोहळ्यात २७१ मोबाइल चोरी झाले होते. यावर्षी पोलिस उपायुक्त आर. सगसुधा यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कडेकोट बंदोबस्तामुळे चोरीच्या घटनांमध्ये घट झालेली दिसून आली.