Join us

अप्पर पोलीस महासंचालकांच्या दालनातून मोबाइल गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 05:51 IST

पोलीस महासंचालक कार्यालयातील राणीहार चोरी प्रकरण ताजे असतानाच, शनिवारी येथीलच राज्याचे कायदा व सुव्यवस्थेचे अप्पर पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांच्या दालनातून त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा मोबाइल गायब झाला आहे.

- मनीषा म्हात्रे मुंबई : पोलीस महासंचालक कार्यालयातील राणीहार चोरी प्रकरण ताजे असतानाच, शनिवारी येथीलच राज्याचे कायदा व सुव्यवस्थेचे अप्पर पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांच्या दालनातून त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा मोबाइल गायब झाला आहे. या प्रकरणी कुलाबा पोलीस तपास करत आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परमवीर सिंह यांना भेटण्यासाठी तक्रारदार व्यक्ती शनिवारी आली होती. शनिवारी सिंह यांच्या टेबलावरच आपला मोबाइल विसरून ती तक्रारदार व्यक्ती बाहेर पडली. थोड्या वेळाने हातात मोबाइल नसल्याचे लक्षात येताच, त्यांनी सिंह यांच्या टेबलाकडे धाव घेतली. मात्र, तेथे मोबाइल मिळून आला नाही. त्यांनी पोलीस महासंचालक मुख्यालय पिंजून काढले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर याबाबत कुलाबा पोलिसांना कळविण्यात आले. कुलाबा पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. मोबाइल मुख्यालयात गहाळ झाल्याचे सांगून, कुलाबा पोलीस टाळाटाळ करताना दिसले. हजारो वस्तू गहाळ होतात. त्यात मोबाइल गहाळ झाला. सगळे विसरलेही, असे वक्तव्य कुलाबा पोलिसांकडून करण्यात आले.पोलीस दलाच्या मुख्यालयात या घटना घडल्याने अधिकारी चक्रावले आहेत. यामुळे मुख्यालयातील हा चोर नेमका कोण? याचा शोध घेणे कुलाबा पोलिसांसमोर आव्हान बनले आहेत. याबाबत कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धोपावकर यांच्याशी वारंवार संपर्क करूनदेखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखीन वाढले आहे.>राणीहारचा शोधही धिम्या गतीने...पोलीस महासंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक अनिता आरेकर यांच्या राणीहार चोरी प्रकरणाकडे कुलाबा पोलिसांनी गांभीर्याने न बघितल्यामुळे, हा दुसरा प्रकार घडल्याच्या चर्चा मुख्यालयात रंगल्या आहेत. चोरीच्या या घटनेमुळे काही महिला अंमलदारांनी दागिने घालणे टाळले आहे, तर अनेक जण आपल्या किमती ऐवजाची काळजी घेताना दिसले.

टॅग्स :चोरी