मनसे कार्यकर्त्यांच्या ‘कृष्णकुंज’बाहेर घोषणा; ‘त्या’ सहा नगरसेवकांना पोलीस संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:45 IST2017-10-15T01:44:20+5:302017-10-15T01:45:22+5:30
महापालिकेतील मनसेची ताकद संपुष्टात आणून सहा नगरसेवक शिवसेनेत गेल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मनसे कार्यकर्त्यांच्या ‘कृष्णकुंज’बाहेर घोषणा; ‘त्या’ सहा नगरसेवकांना पोलीस संरक्षण
मुंबई : महापालिकेतील मनसेची ताकद संपुष्टात आणून सहा नगरसेवक शिवसेनेत गेल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या अस्वस्थ कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानाबाहेर गर्दी करीत, शनिवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे तणाव निर्माण झाल्याने त्या सहा नगरसेवकांच्या घराभोवती तत्काळ पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
भाजपा सत्तेच्या जवळ जात असल्याचे चित्र असताना, शिवसेनेने षटकार लगावत पहारेकरी आणि प्रतिस्पर्ध्यांना चारीमुंड्या चीत केले. भाजपाला धक्का देण्यासाठी शिवसेनेने केलेल्या या खेळीमुळे मनसेचे इंजिन रुळावरून घसरले. त्यामुळे शिवसेना-मनसेत वितुष्ट निर्माण झाले आहे. शुक्रवारी या सहाही नगरसेवकांनी ‘मातोश्री’वर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. पालिकेत मनसेचा केवळ एकच नगरसेवक उरला उरल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे.
हा राग व्यक्त करण्यासाठी शनिवारी राज ठाकरे यांच्या दादर येथील निवासस्थानाबाहेर शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, परमेश्वर कदम, डॉ.अर्चना भालेराव, अश्विनी माटेकर आणि हर्षला मोरे या नगरसेवकांच्या घरांना आणि कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात आले.
नगरसेवक अज्ञात स्थळी गेल्याची हूल
महापौर आमचाच असणार, अशी घोषणा देऊन चिथावणाºया भाजपाचे आव्हान शिवसेनेने मनावर घेतले आणि मनसेच्या नगरसेवक फोडून आपली सत्ता अबाधित ठेवली. मात्र, मनसे कार्यकर्ते खवळल्यामुळे शिवबंधनात बांधले गेलेल्या या सहा नगरसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे या नगरसेवकांना दगाफटका होऊ नये, यासाठी त्यांना अज्ञात स्थळी हलविण्यात आल्याची चर्चा दिवसभर रंगली. मात्र, हे नगरसेवक त्यांच्याच प्रभागात मतदारांना दिवाळीनिमित्त उटणे वाटताना दिसले. ‘अज्ञात स्थळी नव्हे, तर घरातच आहोत,’ असे यापैकी एक नगरसेवक दिलीप लांडे यांनी सांगितले.