Join us
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपचं सरकार आलंय, मारवाडीत बोल"; दुकानदाराचा हट्ट,मनसैनिकांनी दिला चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 17:43 IST

गिरगावात मराठी बोलण्याला विरोध करणाऱ्या दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली.

Girgaon MNS : मलबार हिल विधानसभेतील मनसे कार्यकर्त्यांनी एका दुकानदाराला चांगला चोप दिला आहे. ग्राहकांना मारवाडी भाषेत बोलण्याचा हट्ट करणाऱ्या दुकानदाराला मनसैनिकांनी कार्यालयात बोलवून चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याआधीही नाहूर स्थानकावर मराठी बोलत असल्याने तिकीट नाकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे मुंबईतच मराठी भाषेची सातत्याने गळचेपी होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

गिरगावच्या खेतवाडी भागात एका मारवाडी दुकानदाराने काही महिलांना तुम्ही मराठीत का बोलता असा जाब विचारला होता. तसेच महाराष्ट्रामध्ये भाजपचे सरकार आहे त्यामुळे मारवाडीत बोललं पाहिजे असं दुकानदाराने सांगितलं. त्यानंतर मनसैनिकांनी दुकानदाराला चोप दिला आहे.

सोमवारी गिरगावच्या खेतवाडी भागात एक महिला महादेव स्टोअर नावाच्या दुकानात गेली होती. त्यावेळी दुकानदाराने मारवाडी भाषेत बोलायचं असं सांगितल्याचे महिलेनं म्हटलं. त्यानंतर महिलेने दुकानदाराला असं का विचारले. त्यावर दुकानदाराने भाजप सत्तेत आली आहे त्यामुळे मारवाडीत बोलायचं मराठी भाषेत बोलायचं नाही असं म्हटल्याचे महिलेनं सांगितले.

"त्या महिला माझ्याकडे सामान घेण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी मी त्यांना आता भाजप सत्तेत आली आहे त्यामुळे मारवाडीत बोला असं सांगितले. माझ्याकडून त्यावेळी चूक झाली. मी पुन्हा असं बोलणार नाही," अशी कबुली दुकानदाराने दिली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाहूर रेल्वे स्थानकावर मराठीत बोलल्याने रेल्वे कर्मचार्‍याने तिकीट नाकारल्याचा आरोप करण्यात आला होता. मराठीत तिकीट मागितले तरी हिंदीतच बोला अशी जबरदस्ती नाहूर रेल्वे स्थानकातील तिकिट खिडकीवरील कर्मचार्‍याने केल्याच्या आरोप करण्यात आला होता. त्यानंतर मराठी एकीकरण समितीने यात हस्तक्षेप करत रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती.

टॅग्स :मुंबईमनसे