- महेश पवारमुंबई - राज्यातील महापालिकांची मुदत संपूनही निवडणूक न झाल्यामुळे जनतेचे प्रश्न हाती घेत मनसेने ‘प्रतिपालिका सभागृह’ भरविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जाणकार, तज्ज्ञ व्यक्तींची यादी तयार करण्याचा तसेच, फोर्ट येथे पहिले प्रतिपालिका सभागृह भरविण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला आहे.
दादरच्या राजगड पक्ष कार्यालयात मुंबईतील नेते, सरचिटणीस, विभाग अध्यक्षांची बैठक झाली. यावेळी त्यांनी कामाचे स्वरूप जाहीर केले. पालिका निवडणुकीसाठी येत्या काळात कसे काम करायचे याची रूपरेषा आखून दिली. मुंबईसाठी शहराध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या संपर्कात राहून मराठी माणसांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे आदेश या बैठकीत त्यांनी दिले.
प्रतिमहापौरांची नियुक्ती प्रतिपालिका सभागृहासाठी अन्य पक्षांतील पदाधिकाऱ्यांसह समाजातील विविध घटकांतील १०० मान्यवर व्यक्तींना निमंत्रित करण्यात येणार आहे. कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिमहापौरांचीही नियुक्ती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
रस्ते घोटाळा, नालेसफाई घोटाळा, डिझास्टर मॅनेजमेंट यावर प्रति सभागृहात होणारी चर्चा, ठरावाचे इतिवृत्त आयुक्तांना देऊ, असे त्यांनी सांगितले.
बाइक टॅक्सीसाठी मराठी तरुणांची भरती करामंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बाईक टॅक्सीसाठी ॲग्रीगेटर धोरण जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, चालकांसाठी मराठी तरुणांची भरती करण्यात यावी अशी मागणी परिवहन आयुक्त आणि राज्य सरकारकडे मनसे करेल.