Join us  

“बाळासाहेब ठाकरे हा एक विचार, पक्षाची किंवा व्यक्तीची खाजगी मालमत्ता असू शकत नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 7:12 PM

महापौर बंगल्यात स्मारक करायचे होते, तेव्हा बाळासाहेब पूर्ण हिंदुस्थानचे होते. आता फक्त तुमचेच असे कसे, अशी विचारणा करण्यात आली आहे.

मुंबई: ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण अधिकच तापताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. शिवसेनेसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट यांतील संघर्ष आणखी तीव्र होताना दिसत आहे. यातच आता एकनाथ शिंदे नवीन गटाची स्थापना करणार असून, शिवसेनाबाळासाहेब ठाकरे गट असे नाव देणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, शिवसेनेकडून याला आक्षेप घेण्यात आला आहे. यानंतर मनसेकडून शिवसेनेवर टीका करण्यात आली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून, शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हा एक विचार आहे आणि विचार हा कुठल्या पक्षाची किंव्हा व्यक्तीची खाजगी मालमत्ता असू शकत नाही. जेव्हा महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक करायचे होते तेव्हा बाळासाहेब पूर्ण हिंदुस्थानचे होते. आता म्हणता फक्त तुमचेच असे कसे, अशी विचारणा संदीप देशपांडे यांनी केली आहे. 

कंपाऊंडरच्या सल्ल्याने औषधे देऊन दवाखाना चालत नसतो

शिवसेनेला भगदाड पडल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे पक्ष संघटना टिकवून ठेवण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊ लागले आहेत. याच दरम्यान मनसेने शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. कंपाऊंडरच्या सल्ल्याने औषधे देऊन दवाखाना चालत नसतो. वडिलांनी दवाखाना थाटून दिला तरी डॅाक्टरला स्वतः अभ्यास करुन पेशंटची नस ओळखतां आली पाहिजे… दररोज राऊंड घेतले पाहिजे… कंपाऊंडरच्या सल्ल्याने औषधे देऊन दवाखाना चालत नसतो… एक ना एक दिवस पेशंट शेजारच्या दवाखान्यात जाणारच…!, असे ट्विट मनसे नेते गजानन काळे यांनी केले आहे.

दरम्यान, सूडाच्या राजकारणाचा हा शेवटचा अंक ठरणार आहे. चालू द्या... तुमचाही हिशोब होईलच, असे म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. तसेच अहंकार, माजाच्या अतिरेकाने ज्यांना सत्ता सांभाळता आली नाही त्यांनी किमान स्वतःला सांभाळावे, असा टोला लगावला आहे. भातखळकर यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये अहंकार आणि माजाच्या अतिरेकाने ज्यांना सत्ता सांभाळता आली नाही त्यांनी आता किमान स्वतःला सांभाळावे. भाजपा नेत्यांना शहाणपणाचे सल्ले देण्याच्या भानगडीत अजिबात पडू नये, असे म्हटले आहे.  

टॅग्स :संदीप देशपांडेशिवसेनाबाळासाहेब ठाकरे