Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!

By अतुल कुलकर्णी | Updated: December 29, 2025 11:35 IST

मुंबईत जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या तर ठाण्यात शिंदेसेनेची कोंडी केली जाईल, अशी रणनीती भाजपचे नेते खासगीत बोलून दाखवत होते. मात्र, आता तेच कोंडीत सापडले आहेत का?

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 

मुंबईतील एक उमेदवार सांगत होते, मी नक्की निवडून येऊ शकतो. मात्र, मला उमेदवारीसाठी अमुक नेत्याला एवढे पैसे द्यावे लागतील असे सांगण्यात आले. म्हणजे उमेदवारीसाठी पैसे द्यायचे. प्रचार करताना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना... शेवटच्या दोन दिवसात मतदारांनाही... मग केलेला खर्च व्याजासह वसूल करायला दुसरा मार्ग कोणता असेल? असा सवालही त्यांनी केला. भाजप वगळता अन्य पक्षात उमेदवारी मागणाऱ्यांकडूनच सर्रास पैसे मागतात असे उघडपणे लोक नाव घेऊन बोलत आहेत. अमुक नेत्याच्या जवळ राहणाऱ्याने एवढे पैसे मागितले... असे सांगितले जात आहे. अशाच उमेदवाऱ्या द्यायच्या तर बोलणी, जागावाटपाची नाटके कशासाठी? असा सवाल मुंबईत फिरताना अनेकांनी केला.

त्या-त्या पक्षाचे वरिष्ठ नेते या चर्चेचे काय करायचे ते बघतील. मात्र, भाजपने मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीमध्ये पडती भूमिका तर घेतली नाही ना, असे कार्यकर्त्यांना वाटत आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमित साटम यांनी शनिवारी रात्री जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. मुंबईतील २२७ पैकी १२८ जागा भाजप, तर ७९ जागा शिंदेसेना लढवेल. उरलेल्या २० जागा चर्चा करून ठरवल्या जातील, असे ते म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत आपण १६० च्या खाली जागा घेणार नाही, असे म्हणणाऱ्या भाजप नेत्यांनी १२८ जागांवर समाधान मानले, हे आश्चर्य आहे. उरलेल्या २० जागांमध्येही काही जागा शिंदेसेना घेईल. म्हणजे भाजपच्या वाट्याला १५० पेक्षा कमीच जागा येतील.

ठाण्यातील अस्वस्थता वेगळी आहे. ठाण्यातील भाजपचे एक जुने-जाणते नेते अस्वस्थ होऊन बोलत होते. त्यांच्या मते, ठाण्यातही १३० जागांपैकी ४० जागा घेण्यासाठी भाजप तयार झाल्याचे आम्हाला समजले आहे. त्यातही काही जागा भाजपला दिल्याच तर त्या जागांवरही शिंदेसेनेचे उमेदवार उभे करण्याचे डावपेच आखले जात आहेत. आ. निरंजन डावखरे, संदीप लेले आणि संजय वाघोले हे तिघे एकनाथ शिंदेंच्या बाजूने झुकत चालल्याचे पाहून आम्ही अस्वस्थ आहोत. शिंदे यांना हवे तेच जर हे तिघे करणार असतील तर ठाण्यात भाजपची बाजू मांडायची कोणी? ही असली भाजप आम्ही ठाणे जिल्ह्यात पाहिली नाही. आ. संजय केळकर भाजपच्या बाजूने भूमिका घेतात, म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनासुद्धा तिकिटापासून वंचित राहावे लागत असेल तर ठाण्यात भाजपने स्वबळ दाखवायचे कधी? जे पूर्वी काँग्रेसमध्ये घडायचे ते आता ठाण्याच्या भाजपमध्ये घडताना दिसत आहे. भाजप तहातच हरली तर युद्धात कुठून जिंकणार..? असा सवालही त्यांनी केला.

कल्याण-डोंबिवलीमध्ये एकूण १२२ जागा आहेत. तिथेही भाजपने ५७/५८ तर शिंदेसेनेने ६४/६५ जागा लढवण्यावर मान्यता दिल्याचे समजते. कल्याण-डोंबिवलीत पूर्वी भाजपचे ४२ नगरसेवक होते. त्यापेक्षा जास्त जागा आम्ही घेतल्याचे भाजपला समाधान वाटत असेल, पण प्रदेशाध्यक्षांच्या शहरात कमी जागा घेऊन आम्ही महापौर कसा बनवणार हा प्रश्न भाजप नेत्यांना पडला आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत भाजपने पडती बाजू तर घेतली नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबईत जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या तर ठाण्यात शिंदेसेनेची कोंडी केली जाईल, अशी रणनीती भाजपचे नेते खासगीत बोलून दाखवत होते. मात्र, आता तेच कोंडीत सापडले आहेत का? उद्धव-राज एकत्र आले तरी आम्हाला फरक पडत नाही, असे म्हणणारे नेते तडजोडीवर उतरले नाहीत ना? असे असेल तर या निवडणुका भाजप विरुद्ध राज-उद्धव अशा होतील का? की तशा व्हाव्या असे भाजपला वाटत असावे? राज आणि उद्धव यांच्याकडेदेखील तिकिटांवरून वादावादी सुरू झाली आहे. तेथेही फार वेगळे चित्र नाही. उद्धवसेनेच्या काही जागा मनसेला तर मनसेच्या काही जागा उद्धवसेनेला गेल्या आहेत. त्यावरून तिथेही रस्सीखेच सुरूच आहे. तहात आणि युद्धात भाजप-शिंदेसेना आणि उद्धव-राज यांच्यापैकी कोण जिंकणार याचे चित्र मंगळवारी स्पष्ट होईल.

जाता जाता : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एका भाषणात म्हणाले, आम्हाला अमुक उमेदवार हवा, अशी मागणी जनतेतून यायला हवी. पण जनतेचा आणि ज्यांना निवडणूक लढवायची आहे अशांचा एकमेकांशी काही संबंध उरला आहे का? दिवार सिनेमातला अमिताभ बच्चन यांचा डायलॉग आठवा. ‘मेरे पास बंगला है, गाड़ी, बैंक बैलेंस है, तुम्हारे पास क्या है...’ हाच डायलॉग इच्छुक उमेदवार ऐकवत आहेत. मी अमक्याचा मुलगा..., तमक्याची बायको..., ढमक्याचा भाऊ..., टमक्याची सून... त्यामुळे तिकिटावर माझाच पहिला हक्क... तुमच्याकडे यातले काय आहे? अशावेळी सर्वसामान्य उमेदवार ‘मेरे पास माँ है...’ म्हणजेच ‘माझ्याजवळ चारित्र्य आहे...’ असे सांगत फिरतो आहे. पण, त्याला कोणी दारात उभे करताना दिसत नाही.

‘अनेक माणसं संधीअभावी चारित्र्यवान राहतात’, हे प्रख्यात पत्रकार ग. वा. बेहेरे यांचे वाक्य आजही जशास तसे लागू पडते. संधी न मिळालेले अनेक स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आजूबाजूला भरपूर आहेत. मात्र, त्यांना संधी मिळाली तर ते त्या संधीचे सोने करतील की स्वतःचे चारित्र्य संपवून टाकतील, हे काळच ठरवेल. निवडणुकीचे तिकीट मिळालेल्यांची यादी पाहा आणि ग. वा. बेहेरे यांचे हे वाक्य त्यांच्याशी जोडून पाहा. तुमची तुम्हाला उत्तरे मिळतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Raj-Uddhav Alliance; BJP-Shinde Sena Truce and War in Maharashtra

Web Summary : Mumbai's political landscape sees shifting alliances as BJP compromises on seats in Mumbai, Thane, and Kalyan-Dombivli. Allegations of money exchanging hands for candidacy surface, questioning the integrity of the upcoming elections amid Raj-Uddhav's alliance.
टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक २०२६ठाणे महापालिका निवडणूक २०२६भाजपाशिवसेनाएकनाथ शिंदे