Join us  

मुख्यमंत्रीसाहेब, आधी वांद्रेतील घुसखोरांचे मोहल्ले साफ करा; उद्धव ठाकरेंच्या टीकेला 'मनसे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 10:38 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात रविवार 9 फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता मनसेचा पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात मोर्चा निघणार आहे.

मुंबई - बांग्लादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकला या मागणीसाठी मनसेने येत्या ९ फेब्रुवारीला मोर्चाचं आयोजन केले आहे. या मोर्चाची जय्यत तयारी मनसेकडून केली जात आहे. या मोर्चाचे पोस्टर्स शहरातील विविध भागात लागले आहेत. मात्र मनसेच्या मोर्चावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टीका केली होती. घुसखोरांना हाकला ही भूमिका बाळासाहेबांची आहे त्यामुळे उगाच श्रेय घेऊ नये असा टोला राज ठाकरेंना लगावला होता. 

उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा समाचार घेण्यासाठी मनसेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी थेट मातोश्रीच्या अंगणात पोस्टरबाजी करत मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान दिलं. वांद्रेच्या मातोश्री कलानगर भागात मनसेकडून हे पोस्टर्स झळकविण्यात आले आहेत. यामध्ये लिहिलं आहे की, माननीय मुख्यमंत्रीसाहेब पाकिस्तान आणि बांग्लादेशी घुसखोरांना हाकलंलच पाहिजे हीच आपली भूमिका असेल तर प्रथम वांद्रेतील अंगणात घुसखोरांनी भरलेले मोहल्ले साफ करा असं आव्हान देण्यात आलं आहे. 

याबाबत बोलताना मनसे उपाध्यक्ष अखिल चित्रे म्हणाले की, बांग्लादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकला हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मुद्दा होता. पण आज तो मुद्दा राज ठाकरे पुढे रेटून आहेत. गेल्या दहा वर्षात मनसेचा इतिहास पाहिला तर अनेकदा अशा मुद्द्यावर मनसेने आक्रमणपणे विरोध केला आहे. त्यामुळे आम्ही कोणाला आव्हान केले नाही तर विनंती केली आहे असं त्यांनी सांगितले. तसेच रझा अकदामीने आझाद मैदानात दंगल केली तेव्हा त्यांच्याविरोधात मनसेनेच मोर्चा काढला होता. त्यावेळी हिंदुत्व बोलणारी कुठे गेले होते माहित नाही असा टोलाही शिवसेनेला लगावला. 

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात रविवार 9 फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता मनसेचा पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात मोर्चा निघणार आहे. पोलिसांनी मनसेला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या नव्या मार्गावरुन मोर्चा नेण्यास परवानगी दिली आहे. याआधी मोर्चाचा मार्ग  भायखळा ते आझाद मैदान असा मार्ग निश्चित करण्यात आला होता. मात्र मुंबई पोलिसांनी भायखळ्यातून मोर्चा काढण्यास नकार दिल्याने हा बदल केल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :मनसेउद्धव ठाकरेशिवसेनाराज ठाकरेपाकिस्तानबांगलादेश