Join us
Daily Top 2Weekly Top 5

"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 17:36 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आमच्यावर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करु नका असं म्हटलं आहे.

Raj Thackeray on Hindi: मराठीच्या मुद्द्यावरुन मुंबईतल्या वरळी येथे झालेल्या विजयी मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा जीआर रद्द झाल्यानंतर आंदोलन करणाऱ्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत सरकारला इशारा दिला. वरळीतल्या भाषणात राज ठाकरे यांनी हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्र तोडण्याआधीची चाचपणी होती, असं म्हटलं. यावेळी कुणालाही न विचारता हिंदी सक्ती कशासाठी? असाही सवाल राज ठाकरे यांनी केला. 

त्रिभाषा सूत्र आणि हिंदी शिकवण्याच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आंदोलन उभं केलं होतं. ठाकरे बंधूंनी मोर्चाचा इशारा दिल्यानंतर सरकारने या निर्णयासंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द केले. त्यानंतर वरळी येथे विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्रित सभा पार पडली. भाषणात बोलताना मुंबई वेगळी करण्यासाठी हिंदी भाषेचा मुद्दा वापरला गेल्याचे राज ठाकरे म्हणाले. तसेच आमच्यावर काहीही लादण्याचा प्रयत्न करु नका असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

"एक भाषा उभी करायला खूप लोकांची मेहनत लागते. भाषा अशाच उभ्या राहत नसतात. हिंद प्रांतावर सव्वाशे वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. त्यावेळी आम्ही मराठी लादली का? हिंदी २०० वर्षांपूर्वीची भाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा हिंदी नव्हती. मग हे कशासाठी आणि कोणासाठी करायचं आहे. यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वतंत्र करता येते का यासाठी जरा अगोदर भाषेला डिवचून बघू आणि महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू.  कुणाची माय व्यायली आहे त्यांनी महाराष्ट्रात आणि मुंबईत हात घालून दाखवावा. काय मस्करी वाटली का? काहीही अंगावर लादायचा प्रयत्न करू नका," असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

"हिंदीची सक्ती कशाला करता? हिंदी बोलणारे राज्य मागास आहेत आणि हिंदी न बोलणारे राज्य प्रगत आहेत. मग आम्ही हिंदी शिकून असा काय विकास होणार आहे? कुणालाही न विचारता हिंदी सक्ती कशासाठी? तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून का? तुमची सत्ता विधानभवनात. इथं रस्त्यावर आमची सत्ता आहे," असा इशारा राज ठाकरेंनी दिला. 

टॅग्स :राज ठाकरेमराठीउद्धव ठाकरेहिंदी