Join us

"मूर्तीकारांनी आता विचार करावा, दरवर्षी तोच प्रश्न..."; पीओपी बंदीवर राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 17:16 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घातल्यानंतर भूमिका स्पष्ट केली आहे

Raj Thackeray on POP Ban: मुंबई उपनगरात माघी गणेशोत्सवादरम्यान झालेल्या गोंधळादरम्यान आता मुंबई महानगर पालिकेने मोठं पाऊल उचललं आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी असतानाही माघी गणेशोत्सवादरम्यान अनेक मंडळांनी पीओपीच्या मूर्तींची स्थापना केली होती. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने पीओपीच्या बंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश महापालिका आणि राज्य सरकारला दिले होते. त्यामुळे विर्सजनादरम्यान गणेशभक्तांमध्ये आणि प्रशासनामध्ये मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळालं. त्यानंतर आता भाद्रपदात येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने एक परिपत्रक काढत पीओपी आणि उंच गणेशमूर्तींना बंदी घातली आहे. त्यामुळे मंडळांमध्ये आणि मूर्तीकारांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. यावरुनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मूर्तीकारांना दुसरा मार्ग काढण्यास सांगितला आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेने परिपत्रक जारी करुन सार्वजनिक गणेशोत्सवासाठीही पीओपीच्या मूर्तींना बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर पूर्णपणे बंदी असेल असं परिपत्रकामध्ये म्हटलं आहे. मुंबई हायकोर्टाच्या नियमांचे पालन करूनच मूर्ती घडवावी असे निर्देश परिपत्रकात देण्यात आले आहेत. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मूर्तिकार आणि राजकीय संघटना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "मूर्तीकारांनी पण आता विचार केला पाहिजे. दरवेळी हीच गोष्ट येणार असेल तर मूर्तीकारांनीही गोष्टी बदलल्या पाहिजेत. प्रत्येक वेळी मूर्ती बनवायच्या. तुम्हाला माहिती आहे की सरकारचं काय म्हणणं आहे. त्यामुळे मूर्तीकारांनी हा बदल केला पाहिजे. तोच तोच प्रश्न दरवर्षी कसा काय येतो? दरवर्षी आपण एक भूमिका घ्यायची आणि मग गणपती आल्यावर मूर्त्यांना बंदी आणायची. कारण त्याच्यामुळे होणारे प्रदूषण हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्यामुळे आता मूर्तीकारांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे. काहीतरी दुसरा मार्ग त्यांनी काढला पाहिजे," असं राज ठाकरे म्हणाले.

टॅग्स :राज ठाकरेगणेशोत्सवमुंबई महानगरपालिका