Join us

'अबीर गुलाल' चित्रपटाला मनसे विरोध; पाकिस्तानी कलाकारावरून शालिनी ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 14:52 IST

फवाद खानचा 'अबीर गुलाल' हा सिनेमा प्रदर्शित झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तो उधळून लावल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ठाकरे यांनी दिला.

मनोहर कुंभेजकर

मुंबई - पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटात काम न करू देण्याच्या आपल्या भूमिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण ठाम आहे. फवाद खान या पाकिस्तानी कलाकाराचा 'अबीर गुलाल' नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. याला विरोध करण्यासाठी मनसे चित्रपट सेनेने शड्डू ठोकला आहे. मनसे चित्रपट सेनेच्या कार्याध्यक्ष शालिनी ठाकरे यांनी x post करून आपली भूमिका स्पष्ट केली. 

शालिनी ठाकरे म्हणाल्या की, आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे 'कुंपणच शेत खातंय' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वारंवार सांगूनही भारतातील काही चित्रपट निर्मात्यांचं पाकिस्तानी कलाकारांवर प्रेम उतू जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आधीही पाकिस्तानी कलाकारांना देशातून हाकलून दिलं आहे आणि आताही फवाद खानचा 'अबीर गुलाल' हा सिनेमा प्रदर्शित झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तो उधळून लावल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ठाकरे यांनी दिला.

तसेच पाकिस्तानची लाचारी करणार्‍यांचा चित्रपट प्रदर्शित करू नये! अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते हे आपल्याला चांगलेच माहिती आहे असं सांगत शालिनी ठाकरे यांनी सर्व सिनेमागृह चालकांना आवाहन केले आहे. 

दरम्यान, ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही. ज्यांना पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्यायचंय त्यांनी खुशाल घ्या, पण लक्षात ठेवा सामना आमच्याशी आहे असा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे. 

टॅग्स :मनसे