Join us  

Coronavirus: महाराष्ट्र दिनी केलेल्या घोषणेचा राज्य सरकारला विसर; मनसे आमदाराचं आरोग्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 2:45 PM

महाराष्ट्र दिनी राज्यातील  कोरोनाग्रस्त  १०० टक्के रुग्णांना मोफत उपचार देण्यात येतील अशी घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली होती.

मुंबई – राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असून आतापर्यंत ३० हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर १ हजारापेक्षा जास्त जणांचा जीव गेला आहे. अशातच १ मे महाराष्ट्र दिनी राज्य सरकारकडून कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार केले जातील अशी घोषणा करण्यात आली मात्र प्रत्यक्षात ही घोषणा हवेतच विरली असल्याचं चित्र दिसून येतं.

याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलं आहे, त्यात त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र दिन दिवशी राज्यातील  कोरोनाग्रस्त  १०० टक्के रुग्णांना मोफत उपचार देण्यात येतील अशी घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली होती. अशा प्रकारे मोफत उपचार देणारे महाराष्ट्र पाहिले राज्य असल्याने सर्वच स्तरातून कौतुक होत होते. राज्यावर कोरोनाचे संकट वाढत असताना काही खासगी रुग्णालये मनमानी पध्दतीने दर आकारणी करीत होते त्यांना चाप लावण्यासाठी घेतलेला हा निर्णय योग्य होता. परंतु असा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील सर्व रुग्णालयांना परिपत्रक काढून कळविणे आवश्यक होते तसे परिपत्रक काढलेले आढळून येत नाही त्यामुळे आजही रुग्णांना मोफत उपचार मिळताना दिसत नाहीत असा आरोप त्यांनी या पत्रात केला आहे.

तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील शास्त्रीनगर रुग्णालय हे कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे तर कल्याण मधील हॉलीक्रॉस, डोंबिवली मधील आर.आर. आणि पडले ठाणे येथील नियॉन या खासगी रुग्णालयांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्तांकडून  या रुग्णालय प्रशासनाला पत्रक काढून रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोविड -19  रुग्णाकडून उपचारासाठी बिल आकारण्याच्या पद्धती विशद केल्या आहेत. वास्तविक शासनाकडून कोविड-19 रुग्णांसाठी मोफत उपचार देण्याची घोषणा करण्यात आली असेल तर अशा पध्दतीने बिल आकारण्याबाबत पत्रक कसे काढण्यात आले आहे, त्यामुळे सर्वजण संभ्रमात आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  

त्यामुळे शासनाच्या निर्णयामध्ये अधिक स्पष्टता करून शासन निर्णय राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांना लागू करण्याची आवशकता आहे. आरोग्यमंत्री या नात्याने तातडीने या विषयाची दखल घेऊन राज्यातील सर्व कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत उपचार देण्याबाबतच्या निर्णयाबाबत सर्व रुग्णालयांना स्पष्ट आदेश द्यावेत अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारला केली आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

शाहीद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान; काश्मीर आणि पंतप्रधानावर टीका करत भारताला धमकी, म्हणाला...

रुग्णांवरील अंत्यसंस्कार रखडले; मृतदेहामुळे पसरू शकतो कोरोना व्हायरस? जाणून घ्या सत्य!

मनरेगासाठी अतिरिक्त ४० हजार कोटी देणार; केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

सावधान! कोरोना व्हायरसची नवीन लक्षणं आढळली; WHO चा सतर्कतेचा इशारा

“मुंबई महाराष्ट्राची राजधानी पण आर्थिक नाड्या परप्रातीयांच्या हाती, हे सत्य कसं नाकारणार?”

टॅग्स :मनसेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसराजेश टोपे