Join us

"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 14:14 IST

मनसेने मतदारांच्या यादीतील त्रुटींवर आक्रमक भूमिका घेतल्याने, आगामी काळात ठाणे आणि कल्याण ग्रामीणच्या राजकारणात मतदानाच्या दिवशी मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता बूथ लेव्हल एजंट्स (BLA) सक्षम करण्यावर आणि मतदारांच्या याद्यांमधील कथित 'बोगस' नावांवर लक्ष केंद्रित केले आहे. गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या मनसेच्या महत्त्वाच्या मेळाव्यात अविनाश जाधव आणि माजी आमदार राजू पाटील यांनी ठाणे आणि कल्याण ग्रामीणमधील मतदारांच्या आकडेवारीतील विसंगतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मतदानात होणाऱ्या कथित घोळावर हल्लाबोल केला. यावेळी दोन्ही नेत्यांनी बोगस मतदारांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले.

मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या मेळाव्यात बोलताना २०२० ते २०२४ दरम्यानच्या निवडणुकांमध्ये पडलेली मते ही ईव्हीएम आणि मतदान यादीतील घोटाळ्यातून मिळाली असल्याचा गंभीर आरोप केला. यावेळी त्यांनी बोगस मतदारांना रोखण्यासाठी कार्यकर्त्यांना थेट इशारा दिला. बोगस मतदान पकडणाऱ्या एजंटचा सत्कार ठाण्यात केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. कल्याण ग्रामीणचे मादी आमदार राजू पाटील यांनीही त्यांच्या मतदारसंघातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतांच्या आकडेवारीतील विसंगतीकडे लक्ष वेधले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना 'गोंद्या आला रे आला'च्या ऐवजी 'पुष्पा आला रे' म्हणा असं सांगितले.

"बूथ लेव्हल एजंट अतिशय सक्षम आणि मजबूत असणे गरजेचे आहे. २०२० ते २०२४ या काळात आपण जे काही काम केल त्यानंतर आपल्याला पडलेली मतं ही लोकांनी दिलेली मतं नाहीत. ही मतदान यादी आणि ईव्हीएममध्ये झालेला घोटाळ्यातून मिळालेली मते आहेत. यावेळी ठाण्यातील मी सगळ्या बीएलएला सांगितलेला आहे की मतदान केंद्रात आम्ही पूर्ण तयारीने उतरणार आहोत. आम्ही आताच्या काही मतदार याद्या चाळल्या आहेत. त्यातील १५०-२०० लोकं भेटतच नाहीयेत. ते कोण आहेत, त्यांचा पत्ता काय अशा अनेक त्रुटी आहेत. यावेळी आम्ही याद्यांवर उत्तम काम करत आहोत. जी माणसे भेटत नाहीत त्यांना लाल पेनाने टिक मारायला घेतली आहे. त्याच याद्या बीएलएच्या हातात मतदान केंद्रात जाणार आहेत. त्या याद्या मतदान केंद्रात जातील आणि ज्या नावावर लाल टीक आहे तो जर माणूस मतदान केंद्रात आला तर मी माझ्या लोकांना सांगून ठेवलेले आहे. बाहेर मेसेज पाठवा की गोंद्या आला रे आला. तो येताना पायावर येईल आणि जाताना पायावर जाणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. जो सगळ्यात जास्त बोगस मतदान पकडून देईल त्याचा सत्कार आम्ही ठाण्यात करणार आहोत. यावेळेस कसं बोगस मतदान होतं ते बघूया," असं अविनाश जाधव म्हणाले.

"मी स्वतः विधानसभा निवडणूक लढलो त्याआधी मी लोकसभा निवडणुकीसाठी आमचा येथील एका बबड्याला पाठिंबा दिला होता. तो निवडून आला पण त्यातली गंमत मी सांगतो. माझ्या कल्याण ग्रामीण मतदारसंघात त्यांना एक लाख ५१ हजार मते मिळाली. खरी शिवसेना आहे त्यांच्या उमेदवाराला ६५ हजार मते मिळाली. ८५ हजार मतांचा फरक पडला आणि तो पुढे विधानसभा निवडणुकीला राहील असे वाटले. नोव्हेंबरला जेव्हा निवडणुकीचा निकाल आला तेव्हा खऱ्या शिवसेनेच्या उमेदवाराला ७० हजार मतदान मिळाले. लोकसभेच्या उमेदवारापेक्षा ५००० मते जास्त होती. मला ७५ हजार मतदान मिळाले आणि शिंदे सेनेच्या उमेदवाराला जो जिंकून आला एक लाख ४१ हजार मतदान मिळालं. वाढलेलं पूर्ण मतदान शिंदे गटाला मिळाले," असं राजू पाटील म्हणाले.

"हे सगळं का झालं याचा अभ्यास करायला घेतला, तेव्हा आम्ही दिवा गावापासून सुरुवात केली. याद्या चेक करताना त्यात चार चार, पाच पाच नावं दिसायला लागली. मी ज्या प्रभागात राहतो तिथे चौदाशे मतदार हे दिवा गावातील असल्याचे आढळले. बारीक लक्ष ठेवलं तर ही सर्व नावं निघू शकतात. आपले जे ओरिजनल मतदार आहेत ते मतदानाला येतील. हे करण्यासाठी आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. त्या कमी वेळात आपल्याला सर्व याद्या फिल्टर करून घ्याव्या लागतील. या नावांच्या याद्या बनवून ठेवा आणि पोलिंग एजंटकडे द्या. ते गोंद्या आला रे आला म्हणा असं म्हणाले. मी म्हणतो पुष्पा आला रे म्हणा. कारण माझ्या इथे आमच्या पुष्पाने हे सर्व काम केले आहे," असंही राजू पाटील म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : MNS's code word to stop bogus voting: 'Puspha arrived!'

Web Summary : MNS leaders Avinash Jadhav and Raju Patil raised concerns about discrepancies in voter lists and potential bogus voting. They urged workers to identify and report suspicious voters, using 'Puspha arrived!' as a code.
टॅग्स :राजू पाटीलअविनाश जाधवमनसेराज ठाकरे