Join us  

'...तर त्याच्या कानाखाली जो शॉक बसेल, त्याला राज्य सरकार जबाबदार असेल'; मनसेचा इशारा

By मुकेश चव्हाण | Published: November 26, 2020 1:48 PM

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

मुंबई: कोरोना काळात सर्वसामान्य लोकांना विज मंडळाने पाठवलेली हजारो रूपयांची बिले कमी करण्यात यावी यासाठी मनसेकडून आज आंदोलन हाती घेण्यात आले आहे. राज्यभरात वीजबिलाविरोधात महामोर्चा काढण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये मनसेचे शेकडो कार्यकर्ते वीजबिलमाफीची मागणी करत रस्त्यावर उतरले आहेत.  राज्य सरकारने अनेक वेळा आश्वासन देवूनही विज बिलात कोणत्याही प्रकारची सूट मात्र अद्याप दिलेली नाही. 

कोरोना काळात आधीच लोकांच्या नोकऱ्या गेल्या असताना पाठवण्यात आलेली हजारो रूपयांची बिले भरायची कशी असा प्रश्न गोरगरीबांना पडला आहे. त्यामुळे सरकारने त्वरित विज बिलात सवलत द्यावी अशी मागणी मनसेने केली आहे.  मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने अनेक ठिकाणी मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. तरीही मनसेचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळत आहे. ठाण्यात मनसेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे देखील समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना संदीप देशपांडे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार बोलतात, राजकारण करू नका. मात्र आम्ही बोललो की राजकारण आणि हे करतात ते समाजकारण असं संदीप देशपांडे यांनी सांगितले. तसेच वीज बिल मागायला कोण आलं तर त्याच्या कानाखाली जो शॉक बसेल त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा देखील संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला दिला आहे. 

दरम्यान, ठाण्यात मनसे चांगलीच आक्रमक झालेली दिसून येत आहे. ठाण्यात मनसे आंदोलनादरम्यान पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यानंतर पोलिसांकडून मनसे कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले आहे. आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे. 

नाशिक, नागपूर, पुण्यातही आंदोलन

मुंबई, ठाण्यासह पुणे, नाशिक, नागपूरमध्येही मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलं होतं. पुण्यात मनसेच्या मोर्चाला सुरुवात होण्याआधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली होती. तर मनसेचा गड मानला जाणाऱ्या नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणावर मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. नागपुरात देखील मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वाढीव वीजबिला संदर्भातील निवेदन दिले.

टॅग्स :मनसेराज ठाकरेसंदीप देशपांडेवीजमहाराष्ट्र सरकार