Join us  

"ज्यांच्याकडे महाराष्ट्र सैनिकांची एवढी सुरक्षा आहे;त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार"

By मुकेश चव्हाण | Published: January 10, 2021 2:44 PM

राज ठाकरेंची सुरक्षा व्यवस्था कमी केल्यानंतर मनसेच्या नेत्या रुपाली पाटील- ठोंबरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई: राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कपात केल्यामुळे पुन्हा एकदा राजकारण रंगू लागलं आहे. मनसेप्रमुखराज ठाकरे, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

राज ठाकरेंची सुरक्षा व्यवस्था कमी केल्यानंतर मनसेच्या नेत्या रुपाली पाटील- ठोंबरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. रुपाली पाटील फेसबुक पोस्टद्वारे म्हणाल्या की, ज्यांच्याकडे एवढी महाराष्ट्र सैनिकांची सुरक्षा आहे. त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार आहे. शेवटी महविकास आघाडी पण भाजपासारखी कुचक्या मनाचीच निघाली, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

ज्याच्या कडे एवढी महाराष्ट्र सैनिकांची सुरक्षा आहे त्यांची काय झेड सुरक्षा काढून तीर मारणार आहात

शेवटी महविकास आघाडी पण...

Posted by Rupali Patil Thombare on Saturday, 9 January 2021

मनसेचे नेते किर्तीकुमार शिंदे यांनी देखील ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंवर जीव ओवाळून टाकणाऱ्या अगणित महाराष्ट्र सैनिकांच्या या सुरक्षा कवचात ना कधी कपात होऊ शकते, ना कुणी कधी भेदू शकतो, असं किर्तीकुमार शिंदे यांनी संगितले.

तत्पूर्वी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपाचे खासदार नारायण राणे, आमदार प्रसाद लाड, रावसाहेब दानवे, राम कदम यांना विशेष सुरक्षा यापुढे नसणार आहे. या यादीमध्ये अन्य भाजपाच्या नेत्यांचा देखील समावेश आहे.  

मध्यंतरीच्या काळात देवेंद्र फडणवीस नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांना चिंता लागली होती. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. मात्र देवेंद्र फडणवीसांची झेड सुरक्षा व्यवस्था कमी करत वाय प्लस एक्सकॉर्टसह सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिवीजा फडणवीस यांची सुरक्षा व्यवस्था देखील कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अमृता फडणवीसांना दिली जाणारी वाय प्लस एक्सकॉर्टसह सुरक्षा व्यवस्था कमी करत एक्स सुरक्षा व्यवस्था देण्यात येणार आहे. तसेच दिवीजालाही दिली जाणारी वाय प्लस एक्सकॉर्टसह सुरक्षा व्यवस्था कमी करत आता एक्स सुरक्षा दिली जाणार आहे. 

सरकारचा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण- केशव उपाध्ये

राज्य सरकारच्या या निर्णयानंतर भाजपाने निशाणा साधला आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करत ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडी काढली जाणार, त्याशिवाय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात कपात सरकारचा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

टॅग्स :राज ठाकरेमनसेमहाराष्ट्र सरकारभाजपा