Join us  

'आम्ही सुपारी घेणारे आहोत म्हणता, मग तुम्ही हप्ता घेणारे आहात का?'; मनसेचा शिवसेनेला सवाल

By मुकेश चव्हाण | Published: November 26, 2020 10:39 AM

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने कंबर कसलेली असताना शिवसेनेनेही मिशन मुंबई हाती घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली, या बैठकीत शिवसैनिकांना निवडणुकीसाठी तयारीत राहण्याचे आदेश दिले. दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपा-मनसे एकत्र येणार का? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. याच दरम्यान मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करु शकत नाही, त्यामुळे कोणाची तरी सुपारी त्यांना घ्यावीच लागेल, अशी टीका  शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांनी केली होती. अनिल परब यांच्या या टीकेवर मनसेने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. 

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही सुपारी घेणारे आहोत म्हणता, मग तुम्ही काय हप्ता घेणारे आहात का, असा सवाल बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच अनिल परब आणि माझा प्रवास सारखाच झालेला आहे. त्यामुळे कोण काय करतं हे मला चागलं माहित आहे. जाऊन केबल वाल्यांना विचारुन घ्या, मग कळेल." असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी अनिल परब यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका निवडणूकीत भाजपासोबत युती करायची की नाही, याचा अधिकार मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे घेतील. पक्षप्रमुखांनी एखादा निर्णय घेतला तर आम्ही त्याचं स्वागतच करतो. मात्र सध्या एकला चलो रे अशीच आमची भूमिका असल्याचं मत बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलं आहे. 

तत्पूर्वी, अनिल परब यांनी भाजपा-मनसे संभाव्य युतीवर भाष्य करताना मनसेवर बोचरी टीका केली होती. अनिल परब म्हणाले की, मुंबई महापालिकेत बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही हे माहिती नाही. मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही. त्यामुळे कोणाची तरी सुपारी त्यांना घ्यावी लागेल. मनसेचं अस्तित्व सुपारीवर चालू आहे.आतापर्यंत विविध पक्षांची सुपारी मनसेने घेतली आहे. ज्या भाजपा नेत्यांना लोकसभेत लाव रे तो व्हिडीओ माध्यमातून उघडंनागडं केलं, त्यामुळे आता नागड्यासोबत उघडा झोपला तर काय परिस्थिती होते ही कदाचित पुढे दिसेल. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना जिंकेल असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला होता. 

आम्ही शिवसेनेसारखं लग्न एकबरोबर आणि लफडं दुसऱ्यासोबत केलं नाही- संदीप देशपांडे

मनसेनं जे केलं ते उघडपणे केलं आहे. आम्ही पोटात एक ओठात एक असं केलं नाही. २०१९ च्या निवडणुकीत आम्हाला जी भूमिका देशहिताची वाटली ती आम्ही देशासमोर मांडली, असं संदीप देशपांडे यांनी सांगितले. आम्ही शिवसेनेसारखं लग्न एकबरोबर आणि लफडं दुसऱ्यासोबत केलं नाही. तसेच शिवसेनेनं मराठी आणि हिंदू लोकांसोबत दगाबाजी केली. त्यामुळे आताची शिवसेना ही दगाबाज शिवसेना असल्याचे सांगत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :मनसेबाळा नांदगावकरअनिल परबशिवसेना