शाळांमधील हिंदी सक्तीविरोधात मनसेची सेनाभवन परिसरात बॅनरबाजी
By मनोहर कुंभेजकर | Updated: April 18, 2025 19:05 IST2025-04-18T19:04:16+5:302025-04-18T19:05:39+5:30
पोलिसांनी बॅनर टाकले काढून

शाळांमधील हिंदी सक्तीविरोधात मनसेची सेनाभवन परिसरात बॅनरबाजी
मनोहर कुंभेजकर, मुंबई-इयत्ता पहिलीपासूनच शाळांमध्ये हिंदी सक्तीवरून आता राड ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. 'आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही...', असं म्हणत दादरच्या शिवसेना भवन परिसरामध्ये मनसेच्या वतीनं बॅनरबाजी करत आज सकाळी विरोधप्रदर्शन करण्यात आले होते.मात्र पोलिसांनी काही कारण नसताना सदर लागलेले काढून टाकले अशी माहिती मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी लोकमतला दिली.
दादरच्या सेनाभवन परिसरातील अतिशय दर्शनीय स्थळी मनसेनं ठळक भाषेत हे बॅनर लावल सर्वसामान्यांसह प्रशासनाचंही याकडे लक्ष वेधत सत्ताधाऱ्यांना आव्हान केलं होते. हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा या बॅनरच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला असल्याचे किल्लेदार यांनी स्पष्ट केले.
मनसेने पक्त बॅनरच नव्हे, तर एक पोस्टकार्डवजा बॅनरसुद्धा तयार करत त्यावर मनसेच्या वतीनं अतिशय बोलका मजकूर लिहिण्यात आला होता.
'मा. मुख्यमंत्री व मा. मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय...
हिंदीकरणाच्या बळजबरीला मराठी साहित्य पुरून उरेल! मराठी साहित्यिकांची दूरदृष्टी!!
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी...
पण या आवाहनाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि याला फक्त सरकारच जबाबदार राहील. त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय तात्काळ मागे घेण्याचे आदेश द्यावेत', असं या पोस्टकार्डवजा बॅनरवर ठकणावून सांगण्यात आले होते.त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय तात्काळ मागे घेण्याचे आदेश द्यावेत असे या पोस्टकार्ड मध्ये शेवटी नमूद केले होते अशी माहिती किल्लेदार यांनी दिली.