Join us  

मनसेकडून पंतप्रधान मोदींना फिटनेस चॅलेंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:18 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘गर्दीत फिट तो मुंबईत हिट’, असा व्हीडिओ सध्या सोशल मिडियावर फिरत आहे. 

मुंबई : केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केले आहे. हे चॅलेंज भारताचा कर्णधार विराट कोहलीने देखील स्वीकारलं असून त्याने ते चॅलेंज पंतप्रधान नरेंद मोदी यांनी दिले. मोदी यांनी ट्विटरवरून हे चॅलेंज स्वीकारल्याची माहिती दिली. याच धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘गर्दीत फिट तो मुंबईत हिट’, असा व्हीडिओ सध्या सोशल मिडियावर फिरत आहे. मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यासह योगेश चिले, संतोष साळी आणि विद्युत अशा चार मनसैनिकांनी गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेतील गर्दीत प्रवेश करत प्रवास करतानाचा व्हीडीओ ट्विटरवरून शेअर केला आहे. या ३० सेकंदाच्या व्हीडिओत मोदीजी, मुंबईकरांचे हे फिटनेस चॅलेंज तुम्ही स्वीकारणार का ? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. देशपांडे यांनी ट्विट केलेला व्हीडिओ मुंबईकर रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केलेला आहे.याबाबत ‘लोकमत’शी बोलताना मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे म्हणाले की, मुंबईतील लोकलची गर्दी पाहता मुंबईकरांना फिट राहण्यासाठी आणखी कोणत्या नव्या चॅलेंजची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा व्यवस्थेशिवाय मुंबईच्या गर्दीतून प्रवास करुन दाखवावा. नागपूर रेल्वे आणि मुंबई रेल्वे यातून प्रवास करणे यात फरक आहे. यामुळे हे चॅलेंज राज्याचे मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्री यांनी देखील पूर्ण करुन दाखवावे.रेल्वेच्या ताज्या आकडेवारीनुसार रोज ७६ लाखांपेक्षा जास्त प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. मुंबईतून रेल्वेला रोज कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. तरी देखील मुंबईकरांना रोज गर्दीतूनच वाट काढून प्रवास करावा लागतो. यामुळे ‘गर्दीत फिट तो मुंबईत हिट’ अशी  परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :नरेंद्र मोदीफिटनेस टिप्समनसे