Join us
Daily Top 2Weekly Top 5

"त्यांच्या कोत्या वृत्तीला राज ठाकरेंनी साथ दिली"; उद्धव ठाकरेंनी मनात राग धरून डावलल्याचा संतोष धुरींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:32 IST

राज ठाकरेंनी मनसे उद्धव ठाकरेंना सरेंडर केल्याचा खळबळजनक आरोप संतोष धुरी यांनी केला.

Santosh Dhuri on Uddhav Thackeray: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार तापलेला असतानाच, मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा सुरुंग लागला आहे. मनसेचे आक्रमक नेते संतोष धुरी यांनी राज ठाकरे यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. मात्र, प्रवेशानंतर धुरी यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील छुप्या तहावर जे आरोप केले, त्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर संतोष धुरी यांनी मनसे सोडण्यामागचे धक्कादायक कारण स्पष्ट केले. राज ठाकरे यांनी आपला पक्ष आता पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्याकडे अर्पण सरेंडर केला आहे, असा आरोप त्यांनी केला. २००६ पासून राज ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या धुरी यांनी आता मनसेवर ठाकरे गटाचा ताबा असल्याचा दावा केला आहे. यावेळी संतोष धुरी यांनी मनसे-ठाकरे गट युतीमधील एका करारावरही भाष्य केलं. त्यांच्या दाव्यानुसार संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांवर ठाकरेंचा राग होता. त्यानंतर मातोश्री बंगल्यावरून असा 'तह' झाला की, या दोन्ही नेत्यांना कोणत्याही चर्चेत किंवा निवडणुकीच्या मैदानात स्थान द्यायचे नाही. वरळीत आदित्य ठाकरेंच्या विरोधात केलेल्या आंदोलनांचा राग मनात धरून उद्धव ठाकरेंनी या दोन नेत्यांना बाजूला ठेवण्याची अट घातली होती आणि राज ठाकरेंनी ती मान्य केली, असा आरोप धुरींनी केला.

"विधानसभा निवडणुकीत संदीप देशपांडे जेव्हा उभे होते तेव्हा आम्ही प्रचार करत होतो. त्यावेळी आम्ही ताशेरे ओढले होते. त्यांनी काम केलं नाही, आमदार कधी दिसले नाहीत, असं आम्ही म्हणत होतं. या गोष्टी राजकारणात होत असतात. विरोधात प्रचार केला त्याचा राग ठेवला. सभेमध्ये त्यांच्याबद्दल वाईट बोललो. पण निवडणुका संपल्यानंतर या गोष्टी विसरुन जातात. पण कोत्या वृत्तीच्या मुलाने आणि वडिलांनी या गोष्टी लक्षात ठेवल्या. त्यानंतर तो राग आमच्यावर काढला. त्याला सहाजिक यांनी साथ दिली. तहामध्ये आमचे दोन किल्ले देऊन टाकले आणि विषय संपवा आणि युती करा असं सांगितले," असं संतोष धुरी म्हणाले.

"आमचे रक्त भगवे, पण मनसे झाली हिरवी"

धुरी यांनी राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेवरही कडाडून टीका केली. "ज्या लोकांमुळे आणि ज्या विचारधारेमुळे राज ठाकरेंनी शिवसेना सोडली होती, आज त्याच हिरव्या विचारधारेच्या लोकांशी त्यांनी हातमिळवणी केली आहे. मनसेला युतीत ५२ जागा मिळाल्या असल्या तरी, त्यापैकी ८ जागा निवडून येणेही कठीण आहे," असे भाकीत त्यांनी वर्तवले. माहिम, दादर, शिवडी यांसारख्या मनसेच्या बालेकिल्ल्यातही पक्षाने शरणागती पत्करल्याचे धुरी यांनी म्हटले.

निवडणुकीपूर्वी मनसे बॅकफूटवर?

संतोष धुरींसारख्या जुन्या आणि ज्येष्ठ नेत्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिलेली ही सोडचिठी मनसेसाठी मोठा धक्का मानली जात आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांसारख्या आक्रमक नेत्यांना डावलले गेल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्यास मनसेला मुंबई महापालिकेत मोठी किंमत मोजावी लागू शकते. आता संतोष धुरींच्या या आरोपांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे किंवा संदीप देशपांडे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Santosh Dhuri joins BJP, accuses Thackeray's of petty politics.

Web Summary : Santosh Dhuri joined BJP, alleging Raj Thackeray surrendered to Uddhav. Dhuri claims Uddhav sidelined him and Sandeep Deshpande due to old grudges, a condition Raj accepted for alliance, sacrificing loyalists.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६उद्धव ठाकरेराज ठाकरे