Join us  

मराठी मते फिरविण्यात ‘मनसे’ ठरली अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 6:49 AM

लढत रंगलीच नाही; पहिल्या फेरीपासूनच सेना आघाडीवर

मुंबई : जुन्या इमारतींचा पुनर्विकास आणि पार्किंगचा प्रश्न पेटवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माहिमचा किल्ला सर करण्यासाठी व्यूहरचना आखली. मनसेचा आक्रमक प्रचार, राज ठाकरे यांची सभा यामुळे या मतदारसंघातील लढत अटीतटीची होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात ही लढत रंगलीच नाही. शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली ती शेवटपर्यंत. एकही नगरसेवक नसल्याचा मोठा फटका मनसेला या मतदारसंघात बसला, तर शिवसेनेला भाजपची उत्तम साथ मिळाली. बाल्लेकिल्ल्यात भगवा फडकविण्यात शिवसेनेला पुन्हा एकदा यश आले. मनसेला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

दहा वर्षांपूर्वी मनसेच्या उदयानंतर माहिम मतदारसंघात शिवसेना आणि मनसेत कायम रस्सीखेच दिसून आली आहे. माहिम-दादर या मराठीबहुल मतदारसंघात शिवसेनेप्रमाणेच मनसे समर्थकही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे २००९ मध्ये मनसेचे नितीन सरदेसाई येथे आमदारपदी निवडून आले होते. त्या वेळी या मतदारसंघात दिसून आलेली चुरस पुन्हा रंगेल, असे वाटत होते.

माहिम, दादर परिसरातील जुन्या इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेले अनेक वर्षे रखडला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यातच जुन्या इमारतींमध्ये पार्किंगची सोय नसताना रहिवाशांना रस्त्यावर गाडी उभी करण्यास मनाई करून १० हजार रुपये दंड करण्यात येत आहे. स्थानिकांमध्ये पालिका प्रशासनाबाबत रोष असल्याने मनसेनेही हा मुद्दा उचलून धरत वातावरण तापविले होते.

प्रतिसाद सभेपुरताच

प्रभादेवी आणि लालबागमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांनाही स्थानिक रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी झालेल्या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये करण्यात या वेळीही मनसेची ताकद कमी पडली.

भाजपचे संपूर्ण समर्थन शिवसेनेला येथे मिळाले. भाजपच्या नगरसेविका शीतल गंभीर यांच्याकडे या मतदारसंघाची जबाबदारी होती. माजी महापौर व पालिकेतील सभागृहनेत्या विशाखा राऊत, माजी महापौर मिलिंद वैद्य, प्रीती पाटणकर, समाधान सरवणकर या शिवसेना नगरसेवकांची ताकदही सरवणकर यांच्या पाठीशी होती. त्यांच्या मतांमध्ये तब्बल १५ हजारांची वाढ झाल्याचे दिसून आले, तर मनसेच्या मतांमध्ये केवळ दोन हजार मतांची वाढ दिसून आली आहे.या वेळेस काँग्रेसच्या मतांमध्ये चार टक्क्यांची वाढ झाली आहे. मराठी मते फिरविण्यात यश न आल्यामुळे मनसेला येथे पराभवाचा सामना करावा लागला.

टॅग्स :मनसेराज ठाकरेमाहीममहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019