Join us

मुंबई : केईएम रुग्णालयाला डॉ. आनंदीबाई जोशींचं नाव द्या, मनसेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 14:17 IST

परळ परिसरातील केईएम रुग्णालयाला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी मनसेनं मुंबई महापालिकेकडे केली आहे. 

मुंबई - परळ परिसरातील केईएम रुग्णालयाला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी मनसेनं मुंबई महापालिकेकडे केली आहे. मनसेने केईएम रुग्णालयाचे नाव 'डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालय' करण्याबाबत प्रस्तावही ठेवला होता. त्यानंतर आज डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या 153व्या जयंतीनिमित्त मनसेनं पुन्हा मुंबई महापालिकेकडे ही मागणी केली आहे.

मनसे आपल्या अधिकृत ट्विट हँडलवर याबाबत पोस्टदेखील केली आहे. ट्विटमध्ये मुंबई महापालिका आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना टॅग करण्यात आला आहे. ''केईएम रुग्णालयाचं नाव 'डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालय' करण्यात यावं, या मागणीचं निवेदन मनसेनं दिलं होतं. आज आनंदीबाई जोशी यांच्या जयंतीनिमित्त या मागणीची महापालिकेला आठवण करून देत आहोत'', असं या ट्विटमध्ये म्हटलं गेले आहे. 

पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशींचं डुडल, गुगलकडून मानवंदना

दरम्यान, डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या जयंतीनिमित्त गुगलने डुडलच्या माध्यमातून रेखाचित्र साकारुन आदरांजली वाहिली आहे. आनंदीबाई जोशी या देशातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. त्यांचा जन्म 31 मार्च 1865 रोजी कल्याणमध्ये झाला होता. या रेखाचित्रात नाकात नथ व पारंपरिक मऱ्हाठमोळी साडी परिधान केलेल्या वेशामध्ये आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र त्या दाखवत आहेत.  बंगळुरुतील रेखाचित्रकार कश्मिरा सरोदे यांनी आनंदीबाईंचे हे सुंदर रेखाचित्र साकारले आहे. परदेशातून डॉक्टरकीची पदवी घेऊन येणा-या आनंदीबाई पहिल्या वहिल्या हिंदू महिल्या आहेत.

आनंदीबाई जोशी तमाम महिलांच्या एक आदर्श आहेत. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला होता. आनंदीबाईंचे पती गोपाळराव हे त्यांच्याहून वयाने 20 वर्षे मोठे होते. लहान वयात लग्न झाल्यानं त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.  पण त्यांच्या पतीने त्यांना  शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. अमेरिकेतील पेनसिलव्हेनिया येथील महिला वैद्यकीय महाविद्यालयातून आनंदीबाईंनी वैद्यकीय शिक्षणाची पदवी मिळवली. त्यानंतर ड्रेक्झल विद्यापीठ महाविद्यालयातून त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे स्वप्न घेऊन त्या मायदेशी परतल्या. 

 

टॅग्स :मनसे