Join us  

मनसेने दिले युवासेनेला मराठीचे धडे; २४ तासांत चूक कबुल करत भाषा सुधारली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 10:56 AM

चांगल्या उद्यासाठी सक्रीय आजचा भाग व्हा या वाक्याचा अर्थ काय? मनसेनं आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाईंना प्रश्न विचारला.

मुंबई – राज्यात भोंग्यांच्या राजकारणावरून सध्या शिवसेना-मनसे यांच्यात कुरघोडी सुरू आहे. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्वाची तडजोड केल्याचा आरोप मनसेने केला तर राज्यात नव हिंदू औवेसीच्या माध्यमातून महाराष्ट्रात दंगली भडकवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप करत शिवसेनेने राज ठाकरेंवर बोचरी टीका केली. मनसे-शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असतात. त्यात आता शिवसेनेच्या युवासेनेने केलेली एक चूक मनसेनं निदर्शनास आणून दिली.

अलीकडेच युवासेनेचे अध्यक्ष पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांच्या उपस्थितीत युवासेना सदस्य नोंदणी अभियानाची सुरूवात झाली आहे. या अभियानाच्या माध्यमातून युवकांना युवासेनेत सहभागी होण्याचं आवाहन केले जात आहे. त्यासाठी संकेतस्थळ देण्यात आले. मात्र यावरून मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी हे संकेतस्थळ मराठी भाषेसाठी संकटस्थळ बनलं आहे असं सांगत टोला लगावला आहे. किर्तीकुमार शिंदे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय की, चांगल्या उद्यासाठी सक्रीय आजचा भाग व्हा या वाक्याचा अर्थ काय? हे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सचिव वरूण सरदेसाई(Varun Sardesai) यांनी युवकांना मराठीत, इंग्रजीत आणि हिंदीत जमेल त्या भाषेत सांगावं असं म्हटलं होतं.

त्यानंतर युवासेनेने स्वत:ची मराठी भाषा सुधारली. मराठी वाक्यरचना दुरुस्त केली. त्यावरून हिंदुत्व आणि मराठी आमच्या रक्तात आहे असं म्हणणाऱ्या आदित्य ठाकरे यांचं डिजिटल रक्त काही प्रमाणात का होईना, शुद्ध करता आलं याबाबत समाधान आहे असं सांगत किर्तीकुमार शिंदे(MNS Kirtikumar Shinde) यांनी युवासेनेला चिमटा काढला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-मनसे यांच्यात चांगलाच वाद रंगल्याचं दिसून येते. शिवसेना भवनासमोर हनुमान चालीसा लावणं असो, वा शिवसेनेने राज ठाकरेंविरोधात पोस्टरबाजी करणे असो विविध कारणावरून मनसे-शिवसेना एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं दिसून येते.\

आदित्य ठाकरेंनी केली होती टीका

मनसे हा संपलेला पक्ष असून त्यावर काय बोलणार असं सांगत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेची खिल्ली उडवली होती. त्याचसोबत मशिदीसमोर भोंगे लावणार या विधानाचा समाचार घेत भोंग्यांवरून वाढलेल्या किंमतीवरूनही सांगता आलं तर सांगावं, की या वाढलेल्या किंमती पेट्रोल, डिझेल, सीएनजी यांची दरवाढ कशामुळे झाली आहे. गेल्या साठ वर्षांपूर्वी न जाता गेल्या दोन तीन वर्षांमध्ये का झालं हे सांगावं अशीही टीका आदित्य ठाकरेंनी केली होती.

टॅग्स :आदित्य ठाकरेमनसे