Join us  

'राज ठाकरेंची ही भूमिका महाराष्ट्राला शक्तीशाली बनविण्यासाठी आहे'; भाजपाने केलं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 1:42 PM

राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरीबाबत सर्वांगाने विचार करण्याची मागणी केली आहे. 

मुंबई:  स्थानिक नागरिकांसह संपूर्ण कोकणातून तीव्र विरोध होत असलेला नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात आला आहे.  उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर' रत्नागिरी राजापूर रिफायनरी'सारखा प्रकल्प हातातून गमावणं कोकणाला आणि महाराष्ट्राला परवडण्यासारखं नाही, अशी भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मांडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आज पत्र लिहून राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरीबाबत सर्वांगाने विचार करण्याची मागणी केली आहे. 

उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणाले की, कोकणावर निसर्गाने सौंदर्याची जितकी मुक्त उधळण केली आहे तितकी इतर ठिकाणी फारशी आढळत नाही ह्या विषयी कोणाचंच दुमत असू शकत नाही. प्रत्येक पर्यटन स्थळ हे एखाद्याच विशिष्ट ऋतूत खुलून दिसतं आणि इतर वेळेस ते तितकं मनाला भावत नाही. पण कोकणच्या बाबतीत मात्र निसर्गाने कमाल केली आहे. तिन्ही ऋतूत कोकण सुंदर दिसू शकतं आणि म्हणूनच पर्यटन हा कोकणाचा आणि पर्यायाने माझ्या कोकणी माणसाच्या जगण्याचा श्वास होऊ शकतो, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

राज ठाकरेंनी नाणार प्रकल्पाविषयी मांडलेल्या भूमिकेचं भाजपाने स्वागत केलं आहे. नाणार प्रकल्पाबाबत राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे, असं माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. तसेच राज ठाकरे यांची भूमिका राजकारणाच्या पलीकडची असून महाराष्ट्राला शक्तीशाली करण्याकरता आहे. असे प्रकल्प राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे. आता उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाकरता परवानगी द्यावी, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

कोकण जितका निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे तितकाच सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध आहे आणि नरोत्तमांची खाण आहे. मी माझ्या भाषणात अनेकवेळा ह्याचा उल्लेख केला आहे की 'कोकण किनारपट्टी' असा जर भौगोलिक परिसर बघितला तर ह्या भूमीने ७ भारतरत्नं दिली आहेत. त्यातील ४ तर फक्त एकट्या दापोलीमधील आहेत. पण इतकं असून देखील कोकणी तरुण विषण्ण मनस्थितीत आहे. त्याला नोकरीसाठी, रोजगारासाठी मुंबई-पुण्याची वाट धरावी लागते. खरं तर पर्यटन कोकणाचं भवितव्य बदलू शकतं पण तो विचार नीट झाला नाही. एखादा मोठा प्रकल्प येईल, त्याने भविष्य बदलेल असे आशेचे किरण दिसले खरे पण ते प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकले नाहीत.  अशीच एक संधी पुन्हा एकदा चालून आली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरं तर  सगळेच संदर्भ बदलले आहेत. आपल्या राज्यात, देशात गुंतवणूक यावी ह्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरु आहे. मध्यंतरी एक मोठा आंतरराष्ट्रीय प्रकल्प बेंगळुरूत गेला आणि तो महाराष्ट्रात परत यावा ह्यासाठी महाराष्ट्र सरकारची धडपड सुरु आहे हे मी वाचलं. ही बातमी क्लेशदायक होती. आसपासची राज्यं महाराष्ट्राच्या घशात हात घालून उद्योग पळवून न्यायला टपलेली आहेत. अशा वेळेस महाराष्ट्राने 'रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा प्रकल्प  हातातून गमावू नये. हे महाराष्ट्राला आज परवडणारं नाही, अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली आहे. 

देशाला अभिमान वाटावा असा हजारो वर्षांचा नैसर्गिक आणि जैविक संपदेचा वारसा कोकण किनारपट्टीला लाभला आहे. गाडगीळ समितीच्या अहवालात म्हटल्याप्रमाणे पर्यावरणाचा समतोल राखून पर्यटनाचा विकास कसा साधता येईल आणि निसर्गाची हानी न होता उद्योग आणि प्रकल्प उभे करून स्थानिक तरुणांची प्रगती कशी होईल ह्याचा विचार करून सरकारने धोरण ठरवायला हवं हे मी आपल्याला सुचवू इच्छितो. सरकारने ह्या संदर्भात जर सकारात्मक भूमिका घेतली तर मी आणि माझा पक्ष संपूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. एवढंच नव्हे तर पर्यावरण आणि पर्यटनाच्या अनुषंगाने एक विकास आराखडा तयार करून आम्ही तो आपणांस सादर करू. आपण ह्या माझ्या म्हणण्याचा योग्य तो विचार कराल आणि राज्याच्या दीर्घकालीन हिताचा निर्णय घ्याल अशी मी आशा करतो, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

 

टॅग्स :नाणार प्रकल्पराज ठाकरेसुधीर मुनगंटीवारमनसेभाजपा