Join us  

राज ठाकरेंची सभा शंभर टक्के होणार; २ दिवसांत पोलिसांची परवानगीही मिळणार- नितीन सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 4:08 PM

राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली.

मुंबई- मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या अजेंड्यावर ठाम भूमिका घेतल्यानंतर मनसे पुन्हा एकदा चर्चेत आहे. राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिलेला असून, १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा होणार आहे. मात्र, राज ठाकरेंच्याऔरंगाबाद दौऱ्यापूर्वीच औरंगाबाद पोलिसांनी शहरात जमावबंदी आदेश लागू केले आहेत. त्यामुळे राज ठाकरेंची सभा होणार की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा शंभर टक्के होणार असल्याची माहिती मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली. आमच्या सभेची पूर्वतयारी उत्तम प्रकारे सुरु आहे. औरंगाबादसह मराठवाड्यामध्ये राज ठाकरेंच्या सभेची उत्सुकता दिसून येत आहे. पोलिसांनी अजूनही सभेला परवानगी दिलेली नाही. मात्र येत्या १-२ दिवसांत पोलिसांची परवानगी मिळेल, असं नितीन सरदेसाई यांनी सांगितलं. 

औरंगाबादमध्ये १ मे रोजी राज ठाकरेंची सभा आहे. या सभेला पाच दिवस शिल्लक असताना सभेच्या दोन दिवस आधीच राज ठाकरे कुठे जाणार याबाबत मोठी उत्सुकता लागली आहे. राज ठाकरे २९ आणि ३० एप्रिलला पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. तिथे ते कार्यकर्त्यांसोबत बैठका, मनपा निवडणुकीची मोर्चेबांधणी करतील. यानंतर ३० एप्रिलला सायंकाळी ते औरंगाबादकडे रवाना होतील. 

मनसेचे मुंबई, पुण्यातील कार्यकर्ते, नेते देखील राज यांच्यासोबत औरंगाबादकडे निघणार आहेत. औरंगाबाद पोलिसांनी काढलेल्या जमावबंदीच्या आदेशानुसार, २६ एप्रिल ते ९ मे या काळात औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू असणार आहे. या आदेशानुसार, पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास बंदी असेल. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली. पण, आता या आदेशामुळे राज ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणारी सभा रद्द करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, सभेला परवानगी मिळाली नसली तरीदेखील राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सभेची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस परवानगीच्या भानगडीत पडू नका, सभेच्या तयारी लागा असे आदेश ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पक्षसूत्रांनी दिली आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेनितीन सरदेसाईऔरंगाबाद