Join us  

'...म्हणून राज ठाकरे मुद्दाम मास्क घालत नसतील'; रामदास आठवलेंनी सांगतिलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 8:46 AM

सातारा येथे रामदास आठवलेंची पत्रकार परिषद आयोजित केली होती.

मुंबई: कोरोना काळात लोकांनी मास्क घालावे म्हणून प्रशासनाकडून नेहमी आवाहन करण्यात येते. परंतु मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी आजपर्यंत कधीच मास्क घातला नाही. मंत्रालयात झालेल्या बैठकीवेळीही राज ठाकरेंनी मास्क घातला नाही. अनेकदा कृष्णकुंजवर लोकांनी गर्दी केली तेव्हाही राज ठाकरेंनी मास्क घातला नव्हता. तसेच दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावेळी देखील विना मास्क उपस्थिती लावली.

अलीकडेच मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला शिवाजी महाराज पार्क येथे मनसेकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हाही राज ठाकरेंनी मास्क घातला नव्हता. त्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारताच मी मास्क घालत नाही, तुम्हालाही सांगतोय असं म्हणत उत्तर दिलं होतं. इतकचं नव्हे तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावेळीही राज ठाकरेंनी मास्क घातला नव्हता. 

शिवाजी पार्कात मनसेने मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रमाच्या दरम्यान  राज ठाकरे यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. त्यामुळे पत्रकारांनी राज ठाकरे यांना तुम्ही मास्क लावलेला नाही, असं छेडलं असता, ‘मी मास्क लावतच नाही, तुम्हालाही सांगतो, असं उत्तर दिलं होतं. याचपार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सरकारने दिलेले आदेश पाळले पाहिजे, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.

राज्यात मास्क न वापरणाऱ्या सर्वसामान्य लोकांवर जशी कारवाई होते, त्या पद्धतीने नेत्यावर देखील झाली पाहिजे. राज ठाकरे यांनी सरकारने दिलेले आदेश पाळले पाहिजेत. पण कदाचित राज ठाकरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश पाळायचा नसेल. त्यामुळे ते मुद्दाम मास्क वापरत नसतील, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. सातारा येथे रामदास आठवलेंची पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी रामदास आठवलेंनी राज ठाकरेंच्या मास्क न घालण्याच्या प्रश्नाला उत्तर दिले.

राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल-

राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) मात्र मास्कशिवाय फिरताना दिसतात. काही दिवसांपूर्वी राज यांना याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी मास्क न घालण्याचं आवाहन इतरांना केलं. यावरून ऍड. रत्नाकर चौरे यांनी औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राज यांच्या आवाहनामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.  

टॅग्स :राज ठाकरेरामदास आठवलेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरे