Join us
Daily Top 2Weekly Top 5

कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:44 IST

Raj Thackeray News: लोढा कोणत्या समाजाचे नाही, तर राज्याचे मंत्री आहेत. महाराष्ट्राचा, कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे. तसेच कोणी काय खावे आणि काय खाऊ नये, हे सरकारने ठरवू नये, असे सांगत दादर कबुतरखाना आणि महापालिकेच्या निर्णयावर राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.

Raj Thackeray News: दोन वेगळ्या गोष्टी आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावे लागेल. जैनमुनींनी या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाने जे निर्बंध घातले आहेत, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, असे मला वाटते. दुसरे म्हणजे कबुतरांमुळे काय रोग होऊ शकतात, हे बहुतेक सगळ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. कबुतरांना खायला घालू नये, याबाबत उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत, त्यावर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही धर्माच्या नावाखाली कबुतरांना खायला घातले जात असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे. कारण एकदा या गोष्टीला सुरुवात झाली की, बाकीचे तसेच वागायला सुरुवात करणार. असे होणार असेल, तर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय म्हणायचे कशाला, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दादर कबुतरखाना, मांस विक्री बंदी आणि मतदारयाद्यांमधील घोळ या सर्व विषयांवर सविस्तर भाष्य केले. काही गोष्टींचा विचार आपण करणे गरजेचे आहे. त्यासाठी जी आंदोलने झाली. मराठी एकीकरण समितीने केले. ज्यावेळेस त्यांच्याकडून आंदोलन झाले, तेव्हा पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती, पण कारवाई झाली नाही. यामध्ये लोढा वगैरे येत आहेत. लोढा मंत्री आहे, कोणत्या समाजाचे नाहीत. महाराष्ट्राचा आणि न्यायालयाचा त्यांनी नीट मान राखला पाहिजे. हा नेमका काय प्रकार सुरू आहे, तेच कळत नाही. त्यांना नेमके हवे तरी काय, निवडणुकांसाठी हे सगळे सुरू आहे का, आधी हिंदीचा विषय आणून पाहिला. हिंदी लादली जाते आहे का, ते पाहिले. आता हा कबुतरांचा विषय आणला, या शब्दांत राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. 

कोणी काय खावे आणि कोणी काय खाऊ नये, याचे निर्णय सरकारने घेऊ नयेत

आमच्या लोकांना मी सांगितले आहे की, ते सगळे सुरू ठेवा. पहिली गोष्ट आपण पाहिली पाहिजे की, महापालिकांना याचे अधिकार नाही. कोणी काय खावे आणि कोणी काय खाऊ नये, याचे निर्णय सरकार आणि महापालिकेने घेऊ नयेत. एका बाजून स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करायचा आणि खायचे स्वातंत्र्य नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्या प्रकारची बंदी आणत आहात, हाच विरोधाभास आहे. दोन दिवस आपण पाळतो एक म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि दुसरा प्रजासत्ताक. प्रजेची सत्ता आणि स्वातंत्र्य. मग स्वातंत्र्य म्हटल्यावर तुम्ही बंदी कशी आणता. कोणाचे काय धर्म आहेत आणि कुणाचे काय सण आहेत, या प्रमाणे कुणी काय खावे, हे सरकारने सांगू नये. कोणत्याच सरकारने सांगता कामा नये की, कोणी काय खावे आणि खाऊ नये. कुणाकडून तरी ऐकले की, हा १९८८ साली हा कायदा आणला. असा कायदा केव्हाही आणला गेला असेल, कोणत्याही सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे. स्वातंत्र्यदिनी आपण लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहोत. हा कोणता स्वातंत्र्य दिन. 

दरम्यान,  मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, ते मी २०१६-१७ पासून बोलत आहेत. हे लोक आता बोलायला लागले आहेत. आमचे लोकांनी तपासायला सुरुवात केली आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :राज ठाकरेदादर स्थानककल्याणडोंबिवली