Join us
Daily Top 2Weekly Top 5

...मग माध्यमांशी का बोललास?; राज ठाकरे वसंत मोरेंवर रागावले, सभेत सगळी उत्तरं देतो म्हणाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 14:01 IST

राज ठाकरे आणि वसंत मोरे यांच्यात तासभर चर्चा; शिवतीर्थावरून बाहेर पडल्यावर मोरे भावुक

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षातील नाराज नेते वसंत मोरेंसोबत शिवतीर्थावर चर्चा केली. राज यांच्या भूमिकेबद्दल उघड नाराजी व्यक्त केल्याबद्दल वसंत मोरेंना जाब विचारण्यात आल्याचं समजतं. वसंत मोरेंनी त्यांच्या अडचणी राज यांच्यासमोर मांडल्या. तुला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्या ठाण्यातील सभेत मिळतील. उद्याच्या सभेला ये, असं राज यांनी मोरेंना सांगितलं. एबीपी माझानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

माझ्या सर्व शंकांचं निरसन राज ठाकरेंनी केलं. त्यांच्याशी व्यवस्थित बोलणं झालं. उद्या ठाण्यात राज यांची सभा आहे. त्या सभेला ये. तिथे तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, असं राज ठाकरेंनी सांगितल्याची माहिती मोरेंनी माध्यमांशी बोलताना दिली. राज ठाकरेंनी वसंत मोरेंशी जवळपास तासभर चर्चा केली. या भेटीनंतर मोरे काहीसे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

राज ठाकरेंनी उद्या ठाण्यातील सभेला बोलावलं आहे. या सभेला मी नक्की उपस्थित राहीन. मी मनसेतच आहे आणि मनसेतच राहीन हे पहिल्या दिवसापासून सांगत आहे. मला अनेक पक्षांच्या ऑफर होत्या. त्या सगळ्या ऑफर संपल्या. उद्या राज यांची सभा आहे. तिथेच राज ठाकरे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, असं मोरे म्हणाले.

पार्श्वभूमी काय?मशिदींवरील भोंगे सरकारनं उतरवावेत, अन्यथा मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावू, अशी भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत घेतली. मात्र वसंत मोरेंनी वेगळी भूमिका मांडली. मोरे थेट माध्यमांशी बोलले. पक्षप्रमुखांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अडचणी येत असल्याचं मोरेंनी म्हटलं.

आजच्या बैठकीत काय घडलं?अडचण होती, तर थेट तू माझ्याशी बोलायला हवं होतं. तुला माझ्यापर्यंत ऍक्सेस आहे. मग असं असताना माध्यमांकडे का बोललास, असा सवाल करत राज यांनी मोरेंना जाब विचारला. माध्यमांऐवजी तू थेट माझ्याशी बोलायला हवं होतं, असं राज म्हणाले. त्यावर मी भावनिक होऊन बोललो, असं मोरेंनी सांगितलं.

तुझ्यासह काही जणांच्या मनात माझ्या भूमिकेबद्दल प्रश्न आहेत. त्याबद्दल मी पत्रकार परिषद घेऊन बोलणार होतो. मात्र त्याऐवजी थेट जाहीर सभा घेण्याचं ठरवलं. उद्या ठाण्यात सभा आहे. त्या सभेला ये. तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, असं राज ठाकरे वसंत मोरेंना म्हणाले. उद्याच्या सभेत वसंत मोरेंना भाषण करण्याची संधी मिळू शकते.

टॅग्स :राज ठाकरेमनसे