राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या ६ जुलै रोजी एका भव्य मोर्चाची घोषणा केली होती. मात्र, आता त्यांच्या या मोर्च्याचा दिवस बदलला आहे. एक निवेदन जारी करून त्यांनी याची माहिती दिली आहे.
मनसेचा हा मोर्चा आधी ६ जुलै रोजी होणार होता. मात्र, आता त्याच्या तारखेत बदल झाला असून, ६ ऐवजी ५ जुलै रोजी म्हणजेच शनिवारी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?राज ठाकरे यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर हे निवेदन जारी करण्यात आले आहे. यात लिहिले आहे की, "सस्नेह जय महाराष्ट्र, आज सकाळी आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी येत्या ६ जुलैला मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात थोडा बदल आहे, हा मोर्चा रविवार ६ जुलैच्या ऐवजी, ५ जुलै शनिवारी सकाळी १० वाजता असणार आहे. बाकी ठिकाण आणि इतर सर्व तपशील तसेच असणार आहेत. त्यामुळे माध्यमांनी आणि महाराष्ट्रातील जनतेनी या बदलाची नोंद घ्यावी. आपला नम्र, राज ठाकरे."
पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याच्या सरकारच्या भूमिकेमुळे मराठी भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. याच मुद्द्यावरून आता मनसे रस्त्यावर उतरणार असून, राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा सरकारच्या निर्णयाला आव्हान देणार आहे.