आमदार भाजपा-सेनेचे, 'आउटगोइंग'ही सुरू; उत्तर मुंबईतील उद्धव सेनेचा गड हळूहळू ढासळतोय?
By मनोहर कुंभेजकर | Updated: May 14, 2025 18:21 IST2025-05-14T18:19:18+5:302025-05-14T18:21:14+5:30
Mumbai Politics News: उत्तर मुंबईत काही वर्षांपासून उद्धव सेनेची असलेली पकड कमी होत चालली आहे. गेल्या काही महिन्यांत दहिसर आणि मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील उद्धव सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.

आमदार भाजपा-सेनेचे, 'आउटगोइंग'ही सुरू; उत्तर मुंबईतील उद्धव सेनेचा गड हळूहळू ढासळतोय?
- मनोहर कुंभेजकर
मुंबई -उत्तर मुंबई हा उद्धव सेनेचा नेहमीच गड राहिला होता. मुंबई महापालिकेत उत्तर मुंबईतून मोठ्या प्रमाणात ठाकरे यांचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. तत्कालीन शिवसेना भाजप युतीने मुंबई महापालिकेत एकहाती वर्चस्व निर्माण केले होते. तसेच, दहिसरमधून हरेश्वर पाटील, डॉ. शुभा राउळ यांनी मुंबई महापालिकेत महापौरपद भूषवले होते. अशी पार्श्वभूमी असतानाही या भागात उद्धव सेने समोर आव्हाने आता निर्माण झालेली आहेत.
उत्तर मुंबईत काही वर्षांपासून उद्धव सेनेची असलेली पकड कमी होत चालली आहे. गेल्या काही महिन्यांत दहिसर आणि मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील उद्धव सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. सध्या या दोन्ही मतदारसंघात अनुक्रमे भाजप आणि शिवसेनेचे आमदार आहेत. या स्थितीत मुंबईतील अन्य भागांप्रमाणेच या भागातही उद्धव सेनेने नव्याने उभारी घेण्यासाठी नवीन व्यूहरचना, नवीन नेतृत्व व कार्यकर्ते यांची फळी उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.
शिवसेना भाजप युती संपुष्टात आल्यानंतर आणि शिवसेना पक्षाचे विघटन झाल्यावर उद्धव सेने समोर आणखी आव्हाने निर्माण झाली आहेत. मागठाणे मतदारसंघात काही दिवसांपूर्वी उद्धव सेनेचे माजी नगरसेवक संजय घाडी, प्रवक्त्या संजना घाडी यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यानंतर दहिसर मतदारसंघातील माजी नगरसेवक हर्षद कारकर यांनी कार्यकर्त्यांसह नुकताच शिंदे सेनेत प्रवेश केला.
अशा कठीण परिस्थितीत ही मागाठाणे विधानसभा मतदारसंघात उद्धव सेनेत काही महिन्यांपूर्वी पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, फेरबदलामुळे उमटलेले पडसाद अद्याप शमलेले नाही. मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील दहिसर पूर्वेतील रावळपाडा शाखा क्रमांक ३ आणि ४ येथील उपविभागप्रमुख राजू मुल्ला यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची पदे काढून घेतली होती. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे पंख छाटण्यात आल्याची चर्चा होती. राजू मुल्ला यांचे पद काढून घेतल्यानंतर विभागात उमटलेले तीव्र पडसाद आणि नाराजी अजूनही कायम आहे. तरीही पक्षाशी निष्ठावंत असलेल्या राजू मुल्ला यांच्यासह सर्वच कार्यकर्त्यांनी अन्य कोणत्याही पक्षात न जाता पक्षनिष्ठा कायम ठेवली आहे. गेली ३० वर्षे कट्टर शिवसैनिक म्हणून कार्य करताना मुल्ला यांच्यावर २०१५ मध्ये प्रभाग क्र. ४ चे शाखाप्रमुख आणि २०२१ मध्ये उपविभागप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
मी अद्याप उद्धव सेनेत, तेजस्वी घोसाळकर
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी कौटुंबिक संबंध असताना देखील कालच उद्धव सेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी देखील आपल्या पक्षाचा राजीनामा दिला होता.आज त्यांना ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावले होते. त्यांच्या समस्या त्यांनी मांडल्या.काही समस्या सुटल्या असून काही समस्या अजून शिल्लक आहेत.मी माझ्या राजिनाम्याचे पत्र मी विभागप्रमुखं आणि महिला विभाग संघटकांना दिले होते.त्यांच्या लेव्हल वर सॉर्ट आऊट होईल असे वाटले होते,मात्र ते झाले नसल्याने इकडे यावे लागले.यावर उद्धव ठाकरे मला न्याय देतील, ते काय निर्णय देणार यावर आपली पुढील दिशा अवलंबून असेल. अजून मी काही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला नसून अद्याप तरी मी उद्धव सेनेतच असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.