Join us  

दशसूत्रीचा फलक पुन्हा झळकला; यशोमती ठाकूरांच्या पाठपुराव्या पुढे शिंदे सरकार नरमले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 5:50 PM

यशोमती ठाकूर यांनी संत गाडगेबाबांच्या ‘दशसूत्री’ च्या फलकाचा मुद्दा लावून धरल्यानं शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली. 

मुंबई- मुंबईतील मंत्रालयातील प्रवेशद्वारावर संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीचा लावलेला फलक काही कारणास्तव हटविण्यात आला होता. यामुळे जनतेमध्ये राज्य सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आणि त्याचे पडसाद समाजमाध्यमात उमटू लागले होते. 

संत गाडगेबाबा यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वच्छता, समाजप्रबोधन आणि समाजकार्यासाठी अर्पित केले. संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीचा लावलेला फलक हटविल्याची बातमी समजताच संत गाडगेबाबा मिशन मुंबईच्या अध्यक्षा तथा काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी या कृतीविरोधात आवाज उठवला. 

यशोमती ठाकूर संत गाडगे महाराज यांच्या कर्मभूमी अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांनी त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना २७ ऑक्टोबर २०२२ रोजी थेट पत्र लिहित आपल्या संतप्त भावना कळवल्या. तसेच पूर्वीप्रमाणेच तो फलक लावण्याचा आग्रह केला होता. सोबतच समाजमाध्यमातून हा विषय लावून धरला होता. यशोमती ठाकूर यांनी संत गाडगेबाबांच्या ‘दशसूत्री’ च्या फलकाचा मुद्दा लावून धरल्यानं शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली. 

संत गाडगेबाबांच्या ‘दशसूत्री’चा फलक येत्या दोन दिवसात नव्याने लागेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावी लागली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख मिटवून मंत्रालयात दशसूत्रीचा फलक त्याच जागी पुनर्स्थापित करण्यात आला. त्यामुळे जनतेच्या प्रातिनिधिक वास्तूत पुन्हा एकदा जनतेचे संत गाडगेबाबांचा विचार तेवत राहील, तो हि केवळ ॲड. यशोमती ठाकूर यांच्यामुळे. अखेर एका पत्रानं शिंदे सरकारचा निर्णय पलटला आणि मंत्रालयात दशसूत्रीचा फलक पुन्हा झळकला.

टॅग्स :यशोमती ठाकूरएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र सरकार