Join us  

आमदार विलास तरे शिवसेनेत, 'मातोश्री'वर जाऊन शिवबंधन बांधले 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 7:36 PM

उद्धव यांनी बोलताना श्रीनिवास वणगावर अन्याय होऊ दिला जाणार नाही असे जाहीर वक्तव्य केल्याने

पालघर : पालघर आणि बोईसर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी बदलाचे संकेत मिळत होते. पालघरला अमित घोडा यांच्याजागी श्रीनिवास वनगा तर बोईसरला बविआचे आमदार विलास तरे यांचा शिवसेनेत प्रवेश होत त्यांना बोईसरची उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. त्यानुसार, आज  बोईसरचे आमदार विलास तरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते आमदार तरे यांनी शिवबंधन बांधले. 

उद्धव यांनी बोलताना श्रीनिवास वणगावर अन्याय होऊ दिला जाणार नाही असे जाहीर वक्तव्य केल्याने त्याच्या पुनर्वसनाचा पेच उद्धव यांच्यापुढे असून जनमानसात आपल्यावरचा विश्वास ढळू न देता श्रीनिवासचे योग्य पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यामुळे पालघर विधानसभेचे तिकीट श्रीनिवासला देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. 

बोईसर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून जगदीश धोडी यांचे प्रयत्न सुरू असले तरी त्यांना माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ यांच्यासह अनेकांचा विरोध आहे. या वादामुळे सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वास वळवी यांनी सामाजिक कार्याच्या जोरावर आपल्याला उमेदवारी मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. मी एक शिवसैनिक असून पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखविल्यास आपण लढण्यास तयार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. शिवसेनेतील अनेक वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. दुसऱ्या बाजूने बहुजन विकास आघाडी पक्षाच्या जोरावर दोन वेळा निवडून आलेले आमदार तरे यांना यावर्षी बविआकडून उमेदवारी मिळणार नसल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून बोईसर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठीच आमदार तरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

तरे अनेक महिन्यांपासून सेनेच्या संपर्कात

बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार म्हणून आ. तरे मोठ्या मताधिक्याने निवडून आले असून त्यांनी आपल्या कर्तृत्वाने जनमतावर विशेष प्रभाव निर्माण केलेला नसल्याने त्यांना यावर्षी बविआकडून उमेदवारी नाकारण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळे तरे शिवसेनेच्या संपर्कात होते.

बविआला झटके बसण्याची चिन्हे

विधानसभा निवडणुकीत बविआ पक्षाला अनेक झटके बसण्याची शक्यता असून दुसरीकडे माजी राज्यमंत्री व बविआच्या पालघर विधानसभेच्या उमेदवार मनीषा निमकर याही अन्य पक्षांच्या पर्यायाची चाचपणी करत आहेत. त्यामुळे पालघर लोकसभेच्या कार्यक्षेत्रात येत्या आठवडाभरात पक्षांतराची मोठी उलथापालथ होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. 

टॅग्स :आमदारबोईसरशिवसेनाउद्धव ठाकरे