BJP Suresh Dhas: बीडमधील पवनचक्की कंपनीला २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेला वाल्मिक कराड हा अखेर आज सीआयडीला शरण आला आहे. सीआयडीच्या पुणे मुख्यालयात कराड याने आत्मसमर्पण केलं. केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातही वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्या अटकेसाठी विरोधकांसह सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस हेदेखील आग्रही होते. वाल्मिक कराड आज शरण आल्यानंतर सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत कराडला शरण येण्यास प्रवृत्त केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि या प्रकरणाबद्दल आपल्या अन्य काही मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब घेतलेल्या अॅक्शनमुळे वाल्मिक कराडला शरण यावं लागलं. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना खंडणी मागण्यासाठी वाल्मिक कराडनेच पवनचक्की कार्यालयात पाठवलं होतं. दोन कोटी रुपयांच्या खंडणीतील ५० लाख रुपये त्यांना आधीच मिळाले होते आणि उर्वरित दीड कोटी रुपयांसाठी या आकाने तरुणांना तिथं पाठवलं. त्यामुळे कलम ३०२ अंतर्गत खुनाच्या गुन्ह्यातही ते येतील. तसंच संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर आरोपींनी एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून मारहाण केल्याचं दाखवलं होतं. ती मारहाण आकाने व्हिडिओ कॉलवर पाहिले असेल तरी तो या गुन्ह्यात येईल," असं आमदार धस यांनी म्हटलं आहे.
"संघटित गुन्हेगारांवर आम्ही मकोका अंतर्गत कारवाई करू, अशी घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी केली आहे. त्यामुळे या सर्व आरोपींवर मककोका अंतर्गतही गुन्हा दाखल होणार आहे," अशी माहितीही सुरेश धस यांनी दिली आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांना बिनखात्याचं मंत्री ठेवावं, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनीच केली असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत निर्णय घ्यावा, असं मत सुरेश धस यांनी व्यक्त केलं आहे.