Join us

Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 08:14 IST

Sanjay Gaikwad Latest News: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आमदार निवासात असलेल्या कँटिनमध्ये गायकवाडांनी राडा करत एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली.

Sanjay Gaikwad Mumbai News: वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदारसंजय गायकवाड यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आमदारसंजय गायकवाड यांनी आमदार निवासात असलेल्या कँटिनमधील एका कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. निष्कृष्ट आणि खराब जेवण दिल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासमध्ये आमदार संजय गायकवाड यांनी चांगलाच राडा घातला. आमदार गायकवाडांनी आमदार निवास कँटिनमधील एका कर्मचाऱ्याला जेवणाच्या गुणवत्तेवरून जाब विचारला. इतकंच नाही, तर त्यांनी त्या कर्मचाऱ्याला लाथा बुक्क्यांनी मारलं. 

संजय गायकवाडांकडून मारहाण, नेमकं काय घडलं?

आकाशवाणी आमदार निवासातील खोली क्रमांक १०७ मध्ये जेवण द्या असे आमदार संजय गायकवाड यांनी कँटिनमध्ये सांगितले होते. त्या रुममध्ये जेवण देण्यात आले. पण, कँटिनमधून पाठवण्यात आलेली डाळ निष्कृष्ट दर्जाची होती आणि तिचा वास येत होता. 

ही डाळ खाल्ल्याने काहींचे पोट बिघडले आणि मळमळू लागल्याची माहिती आहे. त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी थेट कँटिन गाठलं. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्याला पकडलं आणि जाब विचारला. डाळीचा वास घेऊन बघ असं म्हणतच त्यांनी कर्मचाऱ्याच्या कानशि‍लात लगावली. 

व्हिडीओमध्ये कर्मचारी माफी मागताना दिसत आहे. पण, गायकवाड यांनी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्यासोबत असलेल्या काही कार्यकर्त्यांनीही कर्मचाऱ्यांची गचांडी धरली आणि मारहाण केली. आमदार निवास कँटिनमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. 

काही दिवसांपूर्वीच केले होते वादग्रस्त विधान

आमदार संजय गायकवाड सतत वादग्रस्त विधाने करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ते बोलले होते. छत्रपती संभाजी महाराज १६ भाषा शिकले, मग ते मूर्ख होते का? छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते, ते मूर्ख होते का? असे गायकवाड म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी या वक्तव्याबद्दल माफीही मागितली. त्या प्रकरणावर पडदा पडत नाही, तोच गायकवाडांनी नवी वादाला निमंत्रण दिले. 

टॅग्स :संजय गायकवाडआमदारशिवसेनाव्हायरल व्हिडिओमुंबई